गुंतवणुकीचे पर्याय, आपल्या उद्याच्या उज्जवल भविष्यासाठी

investment plansगुंतवणूक हा शब्द वर वर जरी खूप सोपा वाटत असला तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या भावी गरजांनुसार योग्य त्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला पाहिजे. सामान्य गुंतवणूकदार सहसा योग्य नियोजन न करता काहीवेळा झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासाने फसवणुकीच्या योजनांना बळी पडतात व आपले मुद्दलही गमावून बसतात. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडावा ह्या हेतूने आपल्याला उपलब्ध असलेले गुंतवणूक पर्याय पाहूया.

१) बँक : बचत खाते , एफ. डी., आर. डी. सरकारी बँकांचे दर हे साधारण खाजगी किंवा सहकारी बँकांपेक्षा कमी असतात मात्र त्यात जोखीम नसते. सहकारी बँका जरी जास्त दर देत असतील तरी त्यात गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बँकांतील व्याजावर ठराविक रकमेच्या वर आपल्याला जास्त कर भरावा लागतो.

२) कंपनी एफ डी : बऱ्याच कंपन्या आपल्या व्यवसायासाठी एफ डी च्या रूपाने भांडवल उभारत असतात. ह्या कंपन्यांचा एफ डी चा व्याज दर हा त्या कंपनीच्या बाजारातील पत मानांकनावर अवलंबून असतो. उच्च मानांकन असलेल्या कंपन्या कमी व्याज दर देतात व कमी मानांकन असलेल्या कंपन्या जास्त व्याज दर देतात. हे व्याज कर पात्र असते. सहसा कंपनीच्या एफ डी मध्ये बँक एफ डी पेक्षा जास्त परतावा मिळतो. मात्र तरलता (लिक्विडीटी ) खूप कमी असते.

३) पोस्टाच्या बचत योजना : पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपण ह्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. बचत खाते, ५ वर्षाचे आर. डी. , टाइम डिपॉजिट, मासिक आवर्ती योजना , वरिष्ठ नागरिक बचत योजना, १५ वर्षाचे पी. पी. एफ. खाते , राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना अशा निरनिराळ्या योजना असतात. पोस्टाच्या योजनांचे व्याज दर जरी कमी असले तरी सरकारी हमी मूळे कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांचा कल ह्या योजनांकडे असतो. ह्यात काही योजनांना कर सवलत असते तर काही योजनांमध्ये कर भरावा लागतो.

४) विमा योजना : विमा योजना तीन प्रकारच्या असतात, जीवन विमा, साधारण विमा आणि आरोग्य विमा. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीने जीवन विमा करणे आवश्यक आहे. जीवन विमा मध्ये एन्डॉवमेंट योजना , मनी बॅक योजना , व्होल लाईफ योजना आणि टर्म योजना अशा निरनिराळ्या योजना असतात. मात्र ह्या योजनांमध्ये फक्त विमा गरज म्हणून पाहावे , कारण ह्या योजनांतील परतावा हा खूप कमी असतो, टर्म योजनेमध्ये आपल्याला काहीही परतावा मिळत नाही मात्र टर्म योजनांमध्ये कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त विमा सरंक्षण मिळते. आपल्या वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीसाठी योग्य आरोग्य विमा घेणे सुद्धा आवश्यक आहे. आपल्या घरातील सामान , दागिने, वाहन ,मौल्यवान वस्तूंसाठी आपण साधारण विमा करणे जरुरीचे आहे जेणेकरून मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास आपले नुकसान होत नाही.

५) म्युच्युअल फंड : यात मुख्यत्वे तीन प्रकारच्या गुंतवणूक योजना असतात. अ) कर्जरोखे संभंदीत योजना (डेट फंड ) ब) समभाग संभंदीत योजना (इक्विटी फंड ) क) कर्जरोखे व समभाग मिश्रित योजना ( हायब्रीड फंड ). ह्या तीन मुख्य प्रकारामध्ये एकूण ३६ प्रकारच्या निरनिराळ्या योजना असतात. वेगवेगळ्या वयोगटातील तसेच जोखीम घेणाच्या क्षमतेनुसार ह्या योजनांची मांडणी केलेली असते. गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठी योग्य प्रकारच्या योजनांची संयोजन करून आपल्या धनवृद्धी साठी फायदा करून घेता येतो. म्युच्युअल फंड च्या योजना बाजारातील चढ उताराशी निगडित असल्याने यात निश्चित असा परतावा नसतो मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो. म्युच्युअल फंड च्या योजनांमध्ये कर सवलती हि जास्त असतात. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याकरिता एक रकमी गुंतवणुकीबरोबरच एस आई पी ( सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ) किंवा एस टी पी ( सिस्टिमॅटिव्ह ट्रान्सफर प्लॅन) सारख्या सुविधा असतात जेणे करून लहान गुंतवणूकदार दर महिना छोटी छोटी गुंतवणूक हि करू शकतात. जेष्ठ नागरिक ज्यांना दरमहा नियमित उत्पन्न हवे असेल त्यांना एस डब्लू पी ( सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन ) ची सुविधा हि असते. आजच्या काळात म्युच्युअल फंड हा सर्वात जास्त पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. डिमॅट अकाउंट असणे आवश्यक नसते. तज्ज्ञ फंड मॅनेजर्स आपल्या गुंतवणूकीची काळजी घेतात.

६) कर्जरोखे किंवा बॉण्ड्स : सरकार तसेच कंपन्या नियमितपणे बाजारामध्ये कर्जरोखे जारी करत असतात. कर्जरोख्यावर निश्चित असे व्याज मिळते. सरकारी कर्जरोख्यांमध्ये अजिबात जोखीम नसते मात्र कंपन्यांनी जारी केलेल्या कर्जरोख्याना त्या कंपनीच्या विश्वासार्हतेनुसार जोखीम असते. कर्जरोख्यांमध्ये तरलता असते व ते बाजारात विकता येतात. बॉण्ड्स मध्ये तरलता कमी असते.

७) समभाग गुंतवणूक ( शेयर बाजार ) : गुंतवणूकदार थेट शेयर बाजारातील समभागामध्ये गुंतवणूक करू शकतात. ह्या गुंतवणुकीसाठी डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. फक्त समभागांमध्ये गुंतवणूक असल्याने जोखीम वाढते मात्र जास्त परतावा मिळायची शक्यता असते. ह्यात गुंतवणुकीसाठी शेयर बाजारातील कंपन्यांचा गाढा अभ्यास करावा लागतो. चुकीच्या कंपन्यांच्या समभागामध्ये गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान सोसावे लागते. बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या कंपन्या असतात जसे ब्लूचीप कंपन्या, सरकारी महारत्न कंपन्या, नियमित लाभांश किंवा बोनस देणाऱ्या कंपन्या, ग्रोथ देणाऱ्या कंपन्या , चक्रीय कंपन्या (सायक्लीकल ) इत्यादी.

८) पी एम एस ( पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विस ) : ह्यात सेबी च्या नियमानुसार किमान रु. २५ लाखाची गुंतवणूक करावी लागते. फंड मॅनेजर हे प्रत्येक गुंतवणूकदाराचे पैसे वैयक्तिक पातळीवर समभागांमध्ये गुंतवणूक करतात. ह्या गुंतवणुकीसाठी डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. फक्त समभागांमध्ये गुंतवणूक असल्याने जोखीम वाढते मात्र जास्त परतावा मिळायची शक्यता असते.

९) भू - संप्पत्ती ( रिअल इस्टेट ) : साधारण गेल्या दशकात रिअल इस्टेट हे एक सर्वाधिक पसंतीचे गुंतवणूक क्षेत्र राहिले आहे. मात्र नजीकच्या काळात मोठ्या शहरात रिअल इस्टेट मध्ये जास्त वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांचा कल दुसऱ्या पर्यायांकडे वळला आहे. रिअल इस्टेट मध्ये शेत जमीन , अर्ध शहरी जमीन, व्यावसायिक मालमत्ता , रो हाऊस किंवा फार्म हाऊस इत्यादी चा समावेश होतो.

१०) मौल्यवान वस्तू : सोने, चांदी, हिरे तसेच इतर मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक हा हि एक पर्याय गुंतवणूकदारांना आहे. मात्र यात चोरी किंवा गहाळ होण्याची भीती असते. सरकारने आता गोल्ड बॉण्ड्स काढले आहेत जे प्रमुख बँकांमध्ये मिळतात. यात बँक आपल्याला सोन्याच्या बाजार भाव प्रमाणे बॉण्ड्स देते. या बॉण्ड्स वर आपल्याला साधारण २.५ % व्याज हि मिळते. ह्या बॉण्ड्स मध्ये तरलता हि अधिक असते. काही गुंतवणूकदार उच्च प्रतीचे चित्रे (पैंटिंग्स) , प्राचीन मूर्ती तसेच विंटेज गाड्या या मध्ये सुद्धा गुंतवणूक करतात , ह्या करिता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेणे उपयुक्त ठरते.

११) कमोडिटी बाजार : ह्या बाजारात धान्ये , फळे ,भाज्या तसेच धातू यांचा व्यवहार होतो. शेती व्यवसायातील गुंतवणूकदार ह्या बाजाराचा लाभ आपल्या गुंतवणुकीसाठी करून घेतात. ह्या बाजाराचे व्यवहार खूप चंचल असतात त्यामुळे गुंतवणूकदारांना गाढा अभ्यास करणे आवश्यक असते अन्यथा नुकसान सोसावे लागते. हे व्यवहार खूप चंचल असल्यामुळे याचा गाढ अभ्यास न केल्यास नुकसान सोसावे लागते.

१२) डेरीवेटीव्हस मार्केट : हा गुंतवणूक पर्याय सर्वात जास्त जोखीम वाला असतो, इक्विटी समभाग किंवा कमोडिटी बाजारात डेरिव्हेटीव्हचे व्यवहार होतात. ह्यात गुंतवणुकीची रक्कम कमी असते व प्रमाण खूप मोठे असते. त्यामुळे बाजारातील छोट्या उतारामध्ये होणारे नुकसान हे ५ ते ६ पटीने मोठे असते. छोट्या गुंतवणुकीदारानी ह्या पर्यायाचा अजिबात विचार करू नये. मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार ह्या पर्यायाचा उपयोग द्वेध व्यवहार रक्षण ( हेजिंग) साठी करतात.

१३) अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड : ह्या गुंतवणूक प्रकारामध्ये किमान गुंतवणूक रु १ करोड असावी लागते. फंड मॅनेजर्स ह्यातील गुंतवणूक अनलिस्टेड कंपनी ची प्रायव्हेट इक्विटी ,स्टार्ट अप्स , रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ह्या मध्ये करतात. ह्यात मोठ्या परताव्याची संधी असते मात्र तरलता खूप कमी असते तसेच जोखीम हि खूप जास्त असते. मोठ्या प्रमाणात मालमत्ता असलेल्या व्यक्ती (एच एन आई ) ह्या गुंतवणूक प्रकाराचा लाभ घेऊ शकतात.

जग प्रसिद्ध गुंतवणूकदार वोरेन बफे यांचा सल्ला "डोन्ट पूट ऑल युअर एग्स इन सेम बास्केट" जर आपण मानला व छोट्या गुंतवणूकदारांना भुलविणाऱ्या पोंजी (फसवणुकीच्या ) योजनांना बळी न पडता, आपण वर उल्लेखिलेल्या योजनांचे योग्य संयोजन जे आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेला तसेच आपल्या भावी गरजांना पूरक असेल, असे केले तर दीर्घावधी मध्ये आपण निश्चित उत्तम धनवृद्धी करू शकू.

निलेश तावडे
९३२४५४३८३२, This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division