उद्योजकतेची मुळाक्षरे... ABCD

Atul Atreऑफिसेस, घरे इतकेच नाही तर सार्वजनिक ठिकाणीदेखील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आपल्या दैनंदिन व्यवहारातील उपयोग सर्वत्र वाढत असल्याचे चित्र आजकाल दिसत आहे. यापैकी जवळपास सर्वच उपकरणं परदेशांमधून आयात केली जातात. प्रचंड मागणी असूनही इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनामध्ये आपण खूप मागे आहोत. एकीकडे वर्षाला सुमारे दीड लाख विद्यार्थी इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडत आहेत आणि दुसरीकडे कुशल मनुष्यबळाची कमतरता ही उत्पादनक्षेत्रातली मोठी समस्या होऊ पहात आहे. ही तफावत लक्षात आल्यावर एका तरुण उद्योजकाने आपला तेजीत चालणारा व्यवसाय सांभाळून प्रशिक्षणाचा नवीन उद्योग सुरू केला. या महिन्याच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत अतुल अत्रे यांच्याविषयी.

गेल्या दीड दोन वर्षांपासून अत्रे यांनी Academy for Business Coaching & Development म्हणजेच ABCD Pvt.Ltd. या नावाने हा व्यवसाय चालू केला आहे. यामध्ये सॅटर्डे क्लबचे मुख्य सदस्य नरेंद्र बगाडे आणि इलेक्ट्रॉनिक्स डिझायनिंग या क्षेत्रातील तज्ज्ञ मिलिंद कळसुलकर यांचीदेखील त्यांना साथ आहे.

अतुल अत्रे हे गेल्या 17-18 वर्षांपासून पार्लेकर असले तरी ते मूळचे घाटकोपरचे. लहानपणापासूनच गुजराथी मित्रांबरोबर वाढल्यामुळे त्यांनी गुजराथी भाषेबरोबरच उद्योजकतेचे बाळकडूही तेथूनच घेतले. अभ्यासात अनेकदा सामान्य असणाऱ्या या मुलांच्या बोलण्यात शालेय वयापासूनच ट्रेडिंग, केमिकल्स, बॉल बेअरींग्ज, नफा तोटा असे विषय असायचे. हे ऐकतच मोठे झाल्याने अत्रेंचा कल व्यवसायाकडे आपसुकच वळला. तरीही कुठल्याही मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाप्रमाणे इलेक्टॉनिक्स इंजिनिअरींची पदवी घेतल्यावर त्यांची सुरुवात नोकरीनेच झाली. पण दोन तीन वर्षातच आपण नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. घरून वडिलांनीही पूर्ण पाठिंबा दिला. हातात असलेल्या पंचवीस हजाराच्या भांडवलावर इलेक्ट्रॉनिक पार्टसच्या व्यवसायाला सुरुवात झाली. वय तरुण होतं आणि याच क्षेत्रातील शिक्षणही घेतलेलं होतं. त्यामुळे फारसा धोका नव्हता. मात्र थोड्याच अवधीत त्यांना जाणवलं की आपल्याकडे उत्पादनक्षेत्राला अनुकूल वातावरण नाही. मग त्यांनी परदेशी टेलिकॉम उत्पादनांची विक्री, ट्रेडींग आणि मेंटेनन्स असा व्यावसायिक बदल केला. अल्पावधीतच या व्यवसायाने जोर धरला. आज सुमारे 100 पेक्षा अधिक माणसं त्यातही चाळीसहून अधिक इंजिनिअर्स त्यांच्याकडे काम करत आहेत. मुंबई आणि पुण्याला ऑफिस आहे. शेकडो डिलर्सच्या माध्यमातून राज्यात सगळ्या लहानमोठ्या जिल्ह्यांमध्ये या उद्योगाचा पसारा वाढत आहे.

या व्यवसायाच्या निमित्ताने अत्रे यांचा ठिकठिकाणच्या उत्पादकांशी संबंध येत गेला. त्यातूनच ABCD ची संकल्पना साकारली. याविषयी ते म्हणतात, ”माझ्या कामासाठी मी राज्यभरात फिरतो. तेव्हा मला जाणवलं की उत्पादनक्षेत्रामध्ये skilled manpower ची खूप कमतरता आहे. दुसऱ्या बाजूला लाखो मुलं इंजिनिअरींगची डिग्री घेऊन बाहेर पडतायत. मागणी आहे आणि पुरवठाही आहे. पण यांच्यात ताळमेळ नाही. इंडस्ट्रीजला जे कुशल तंत्रज्ञ हवे आहेत त्या प्रकारचं ज्ञान या पदवीधारकांकडे नाही. व्हेकन्सीज भरपूर आहेत पण तिथे काम करायला योग्य उमेदवार मिळणे मुश्किल झाले आहे. असंही लक्षात आलं की इंजिनिअरींगच्या अभ्यासक्रमात इंडस्ट्रीजची गरज विचारात घेतलेली नाही. म्हणून मला प्रशिक्षणात काम करावसं वाटलं. सरकार आपल्या परीने प्रयत्न करेलच पण आमच्यासारख्या अनुभवी उद्योजकांनीदेखील या कामात पुढाकार घ्यायला हवा. मी सॅटर्डे क्लब या बिझिनेस नेटवर्किंग ग्रूपच्या एलिट क्लबचा मेंबर आहे. यात माझा अनेक व्यावसायिकांशी संबंध येतो. प्रॅक्टिकल इलेक्ट्रॉनिक्सचं प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची माझी कल्पना तिथले अनुभवी उद्योजक नरेंद्र बगाडे आणि मिलिंद कळसुलकर या मित्रांनादेखील आवडली. तरुणांना विविध प्रकारच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारे प्रॅक्टिकल ज्ञान द्यायचं या उद्देशाने आम्ही ट्रेनिंग कोर्सेस, कार्यशाळा, शिबिरं अशा पद्धतीचं काम सुरू केलं आहे.

कळसुलकर हे उत्तम प्रशिक्षक तर आहेतच पण त्यांना इंजिनिअरिंगची बेसिक्स विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवण्याची प्रचंड तळमळ आहे. साधं सर्किट कसं डिझाइन करतात हेदेखील आज मुलांना माहित नाही. थिअरी आणि प्रॅक्टिकलमधली ही दरी कमी व्हायला हवी. मालाडमध्ये आमचं ऑफिस आहे. तिथे तरुण मुलांना क्लासरुम ट्रेनिंग दिलं जातं. इथे शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच नोकरी करणाऱ्या अनेकांना माफक दरात आम्ही ट्रेनिंग देतो. आम्हाला अनेक इंजिनिअरिंग कॉलेजांमधूनही त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यासाठी बोलावलं जातं.
घराघरात आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो मग याची तांत्रिक ओळखही जास्तीत जास्त मुलांना व्हावी हा आमचा उद्देश आहे. मराठी मुलांनी लहानसा का होईना पण स्वत:चा बिझिनेस सुरु करावा. चांगल्या मार्गाने भरपूर पैसा कमवावा. स्वत:बरोबर इतरांचाही विकास करावा असं मला मनापासून वाटतं. आमच्याकडून घेतलेल्या प्रशिक्षणातून विद्यार्थीसुद्धा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतील. असं झालं तर पुढच्या 5 वर्षात आपण मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करू शकू. उद्योजकतेचे धडे गिरवणाऱ्या या बेसिक पासून अॅडव्हान्स पर्यंतच्या या कोर्सेसमध्ये डिजिटल मार्केटींग, वेब डिझायनिंग, ज्वेलरी मेकींग अशा सर्वच उद्योगांचा विचार आम्ही केला आहे आणि त्यासाठी त्या त्या व्यवसायातील अनुभवी प्रशिक्षकदेखील आमच्याकडे आहेत. मराठी तरुणांमध्ये उद्योजकतेचे बीज रुजावे यासाठी फंडींगसकट लागेल ती मदत करायचे आम्ही ठरवले आहे. सॅटर्डे क्लबचेही आम्हाला सर्वतोपरी सहकार्य आहे.’

अत्रे यांच्याशी बोलताना जाणवले की आज आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती एक टक्का देखील नाही. ही आकडेवारी बदलायची असेल आणि मेक इन इंडिया हा ब्रॅण्ड जर खऱ्या अर्थाने यशस्वी करायचा असेल तर उद्योजकतेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी असे यशस्वी उद्योजकच जर पुढाकार घेत असतील तर त्याहून अधिक चांगली गोष्ट नाही. (संपर्क – 9820147850)

- चित्रा वाघ
9821116936

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division