सोने खरेदी करण्यापूर्वी ..

Goldदसरा- दिवाळी म्हटली की आपल्या मराठी बांधवांची सोने खरेदीची धावपळ चालू होते. बरेच जण सोनाराकडे जाऊन सोन्याची नाणी किंवा सोन्याचे दागिने खरेदी करीत असतात. ह्या सणासुदीला सोने खरेदीदार थोडे द्विधा मनस्थितीत दिसतायेत. कारण गेल्या ६-८ महिन्यात सोन्याचे भाव २०% पेक्षा जास्त वाढले. नवीन सोने आता खरेदी करावे का की थोडे थांबून सोन्याचे भाव खाली येतात का पाहावे असा विचार करताना सोने खरेदीचा निर्णय करणं अवघड जात आहे. सोने खरेदी करणारे दोन प्रकारचे लोक असतात. १) ज्यांना आपल्या मुला/मुलींच्या काही वर्षानंतर होणाऱ्या लग्नसराईसाठी सोने जमवायचे असते. २) काहींना सोने हा अतिशय सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय वाटतो म्हणून. 

जेंव्हा आपण सोन्याची नाणी किंवा दागिने घेतो किंवा विकतो, तेंव्हा सोनाराकडून वजनामध्ये किंवा किमतीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते. तसेच भेसळीची शक्यता होऊ शकते. काहीवेळा आपण बाळगीत असलेल्या सोन्याच्या चोरीचीही आपत्ती आपल्यावर ओढवू शकते. आपल्या सोन्यातील गुंतवणुकीत आपली अजिबात फसवणूक होऊ नये म्हणून आपल्यासाठी बाजारामध्ये काही पर्याय उपलब्ध आहेत.

१) भारत सरकारची गोल्ड बॉण्ड योजना.
a. भारतीय नागरिक, HUF, शैक्षणिक आणि धार्मिक ट्रस्टस या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात.
b. कमीत कमी १ ग्राम सोने इतका एक बॉण्ड असतो, भारतीय नागरिक वर्षाला ४ कि.ग्राम पर्यंतचे बॉण्ड घेऊ शकतो. तसेच HUF व ट्रस्टस वर्षाला २० कि.ग्रामचे बॉण्ड घेऊ शकतात.
c. बॉण्डचा कालावधी हा ८ वर्षाचा असतो मात्र ५ वर्षानंतर बॉण्डवरील व्याज मिळण्याच्या तारखेला तुम्ही हे बॉण्ड विकू शकता.
d. गोल्ड बॉण्ड आपल्याला सरकारी बँक, ठराविक पोस्ट कार्यालये, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची कार्यालये किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर खरेदी करता येतात. गोल्ड बॉण्डचे सर्टिफिकेट किंवा आपण ते डिमॅट अकाउंटमध्ये सांभाळू शकतो. गोल्ड बॉण्ड जर दुय्यम बाजारातून घेतले तर गुंतवणूकदाराला वर उल्लेखिलेल्या गोल्ड बॉण्ड खरेदी मर्यादेचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते.
e. गोल्ड बॉण्डचे खरेदीदार जर जोडीदार असतील तर गोल्ड बॉण्डची मर्यादा प्रथम धारकाला लागू होते.
f. गोल्ड बॉण्डची किंमत ही ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी किमतीवर ठरवली जाते. प्रत्येक महिन्याच्या काही ठराविक दिवशी ४-५ दिवस ही योजना गुंतवणूकदारांना खुली असते. योजना ज्या आठवड्यामध्ये खुली होते त्याच्या आदल्या आठवड्यातील लागोपाठच्या ३ व्यवसाय दिवसाच्या सोन्याची सरासरी किंमत (इंडिया बुलिओन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेली) ही त्या गोल्ड बॉण्ड ची किंमत असते.
g. गोल्ड बॉण्ड जर रोखीने खरेदी करायचे असतील तर कमाल रु.२०,००० रक्कमचे बॉण्ड घेऊ शकतो. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी जर हे बॉण्ड नेट बँकिंगने खरेदी करायचे असतील तर सरकारतर्फे प्रत्येक ग्रॅम सोन्यामागे रु. ५०ची सवलत दिली जाते.
h. GS ACT 2006 भारत सरकारचा समभाग- या अंतर्गत गोल्ड बॉण्डचे वितरण केले जाते. गुंतवणूकदारांना धारण प्रमाणपत्र वितरित केले जाते. गुंतवणूकदार त्याला डिमॅटमध्येही रूपांतरित करू शकतो.
i. गुंतवणूकदाराला जेंव्हा हे बॉण्ड विकायचे असतात तेंव्हासुद्धा किंमत निर्धारित करण्याकरिता वर उल्लेखिलेली ३ दिवसाच्या सरासरी किमतीची पद्धत अवलंबली जाते.
j. गुंतवणूकदाराला वार्षिक २.५% दराने दर सहामाहीला गोल्ड बॉण्डवर व्याजही दिले जाते. गुंतवणूकदाराला जर कर्ज घ्यायचे झाल्यास, गोल्ड बॉण्ड तारण म्हणून ठेवता येते. रिझर्व्ह बँकेची सोने तारण कर्ज संबंधित नियमावली ह्यासाठी लागू होते.
k. गोल्ड बॉण्ड खरेदीपूर्वी गुंतवणूकदाराला KYC साठी लागणारी कागदपत्रे तसेच त्याचा पॅन नंबर अत्यावश्यक असतो.
l. गोल्ड बॉण्डवर मिळणारे व्याज हे आयकर कायदा १९६१ ( ४३/१९६१) च्या तरतुदीनुसार करपात्र असते. मात्र गोल्ड बॉण्ड किमान ५ वर्षानंतर बँकेला विकतेवेळी त्यावर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही. बॉण्ड जर ५ वर्षांपूर्वी दुय्यम बाजारात दुसऱ्या गुंतवणूकदाराला विकायचे असल्यास होणाऱ्या भांडवली लाभावर कर भरावा लागतो.

२) म्युच्युअल फंडाचे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड

a. ह्यासाठी गुंतवणूकदाराला त्याचे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे.
b. गोल्ड EIF मध्ये खर्च खूप कमी असल्याने गुंतवणूकदाराला जास्त फायदा होतो. म्युच्युअल फंड साधारण १% इतका खर्च आकारतात. त्या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांचा शेयर ब्रोकरची दलाली आकारात असेल ती द्यावी लागते. गोल्ड EIF ची खरेदी विक्री ही कंपनीच्या समभागाप्रमाणे शेयर बाजारावर करता येते.
c. गोल्ड EIF शेयर बाजारावर विकल्यानंतर होणाऱ्या भांडवली लाभावर कर भरावा लागतो. ३ वर्षापर्यंत त्याला शॉर्ट टर्म भांडवली लाभ म्हणतात व त्याला गुंतवणूकदाराच्या एकूण मिळकतीमध्ये समाविष्ट करून त्याला त्यावर कर भरावा लागतो. ३ वर्षनंतरच्या विक्रीवर होणारा भांडवली लाभ हा लॉन्ग टर्म भांडवली लाभ मानला जातो व त्यावर लागणारा कर हा कमी असतो.

वर माहिती दिलेले दोन्ही पर्याय हे गुंतवणूकदारांसाठी जास्त फायद्याचे आणि सोयीस्कर आहेत. ना सोन्याच्या चोरीची भीती ना सोनाराकडून होणाऱ्या फसवणुकीची भीती. आपल्याला आपल्या मुलांच्या लग्नात जेंव्हा दागिने बनवायचे असतील त्यावेळी आपली गुंतवणूक मोडून आपल्या मुलांच्या पसंतीचे दागिने बनवू शकतो.
सोन्यामध्ये गुंतवणूक करणार्यांनी या उपयुक्त पर्यायांचा जरूर विचार करावा.

- निलेश तावडे
9324543832

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division