कुशल नेतृत्व - श्री. गौतम ठाकूर - चेअरमन , सारस्वत बँक
गौतम ठाकूर, ह्यांची भेट घेण्यासाठी, प्रभादेवी येथील सारस्वत भवनात पोचलो आणि इमारतीच्या मुख्य दरवाज्यातच सुरक्षा रक्षकाकडून झालेल्या नम्र आणि सुहास्य अभिवादनाने एका अतिशय वेगळ्या अश्या अनुभवाची नांदी झाली. काही काही वास्तूच आपल्याला बरेच सांगून जातात. स्वागतकक्षात प्रवेश केल्याबरोबर उजव्या हाताला, सोनेरी अक्षरांत लिहिलेल्या संतवचनांमध्ये उभी असलेली काळ्याशार दगडामधून कोरलेली साधारण पाच फूट उंचीची विठ्ठलाची अप्रतिम मूर्ती तुम्हाला एका वेगळ्याच अनुभूतीचा अनुभव देते. त्यामुळे साहजिकच, माझा पहिला प्रश्न गौतमजींना हाच होता की, विठ्ठलमूर्तीच्या स्थापनेमागे कोणती प्रेरणा होती? गौतमजी म्हणाले, " ही संकल्पना, माझे वडील, श्री. एकनाथजी ह्यांची आहे. त्यांच्या मते, विठ्ठल ही सहकाराची देवता आहे. ज्या प्रेरणेने वारकऱ्यांच्या दिंड्या परस्पर सहकार्याने मैलोनमैल प्रवास करत पंढरपूरास येतात, तीच प्रेरणा ह्याच्यामागे आहे. त्यांत आमची सहकारी बँक आहे. त्यामुळे तर हे जास्त सयुक्तिक आहे." मला महाराष्ट्राच्या ह्या लाडक्या दैवताकडे बघण्याचा एक नवीनच दृष्टिकोन मिळाला. ' सारस्वत भवनाची ' वीट न वीट ही स्व. एकनाथजींच्या देखरेखेखाली बसवलेली आहे, हे ही त्या ओघात त्यांनी सांगितले. अश्या एका न ठरवलेल्या प्रश्नाने गप्पांना सुरवात झाली आणि पुढील तासभर रंगतच गेल्या. निगर्वी देखणेपण, अभिजात उमदेपण आणि संस्कारित सुविद्यता असा अतिशय मुश्किलीने आढळणारा त्रिवेणी संगम, मला गौतमजींच्या व्यक्तिमत्वात पाहावयास मिळाला. शांत, संयत परंतु स्पष्ट आणि अजिबात आक्रमक नसूनसुद्धा असलेले ठाम बोलणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू. माननीय स्व. एकनाथजींचा विषय निघालाच होता, म्हणून तोच धागा पकडून, मी त्यांना विचारले, " एकनाथजींकडून जो वारसा तुम्हाला मिळाला त्याबद्दल काय सांगता येईल?" ते थोडेसे हसून उत्तरले, " सर्वच तर त्यांच्याकडूनच मिळाले आहे," मग थोडेसे गंभीर होऊन त्यांनी बोलायला सुरवात केली. " मी सोळा वर्षाचा असतानाच वडिलांनी मला त्यांनी चालू केलेल्या नॅशनल स्कुल ऑफ बँकिंगच्या पुणे शाखेचे व्यवस्थापन माझ्याकडे सोपवले. माझे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झाले. सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच मी ही जबाबदारीदेखील सांभाळत होतो. कामाचा आवाका जरी फार मोठा नव्हता तरी, एव्हढ्या लहान वयात एक संस्था चालविण्याची जी जबाबदारी मला सोपविली गेली, त्याचा मला माझ्या पुढील आयुष्यात फारच मोठा फायदा झाला. माझ्यातल्या नेतृत्वगुणांची बीजे तिथेच खऱ्या अर्थाने रोवली गेली. माझ्या दृष्टीने महत्वाचा असा दोन गोष्टींचा वारसा मला मिळाला, ज्या मी आजच्या घडीपर्यंत आचरणांत आणत आहे आणि त्या म्हणजे सार्वजनिक जीवनातले मूल्याधिष्ठित आचरण आणि वाचनाचे वेड ." तसे तर, गौतमजी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची एन.एस. बी. प्रॉपर्टीज नावाची कंपनी आहे आणि त्यामार्फत ते औद्योगिक आणि हौसिंग अश्या दोन्ही प्रकल्पांची कामे करतात. त्याचबरोबर, ते सारस्वत सहकारी बँक ह्या देशातल्या सहकार क्षेत्रातल्या अग्रगणी बँकेचे चेअरमनदेखील आहेत. ह्या दोन्ही जबाबदाऱ्या कशा पद्धतीने ते पार पाडतात ह्या माझ्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की आता दिवसातला साधारणपणे फक्त २०टक्के वेळ हा माझ्या बांधकाम व्यवसायासाठी असतो आणि उरलेला ८०%टक्के वेळ सारस्वत बँकेच्या कामकाजासाठी व्यतीत होतो. मी गेल्या काही वर्षापासूनच माझ्या बांधकाम व्यवसायामध्ये माझ्या हाताखाली काम करणाऱ्यांची अशी सशक्त फळी निर्माण केलेली आहे की मला आता तेथे कमी वेळ देऊनसुद्धा कंपनीचे कामकाज व्यवस्थित चालते. काही महत्वाच्या किंवा अधिक गुंतागुंतीच्या कामांसाठीच मला लक्ष घालावे लागते अन्यथा माझ्या अनुपस्थितीतसुद्धा कंपनीचे कामकाज सुरळीत चालू राहते.” खरे तर,एक बांधकाम व्यावसायिक आणि एका अग्रगणी सहकारी बँकेचे चेअरमन? हा खरा मनातला प्रश्न होता. पण मला तो विचारायलाच लागला नाही. चाणाक्ष गौतमजींनी तो ओळखलाच होता आणि ते त्याकडे आपणहूनच वळले. म्हणाले," हा प्रश्न आता नाही, पण, मी जेव्हा सुरवातीला सारस्वत बँकेच्या बोर्डवर आलो तेव्हा अनेकदा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पद्धतीने हा प्रश्न मला विचारण्यात आला होता. एक तर, शैक्षणिकदृष्ट्याही मी, इंजिनीअरिंग नंतर फायनॅनशिअल मॅनेजमेंट शिकलो पण, माझा तो मुद्दाच नाही आहे. मी सुरवातीला फक्त एक बोर्ड मेम्बर होतो, आणि एक बोर्ड मेम्बर ते चेअरमन हा प्रवास मी स्वतःला सिद्ध करतच केलेला आहे. मला बँकिंगचे सगळे बारकावे माहित असण्याची काही गरजच नव्हती. माझे काम सर्वांना बरोबर घेऊन बँकेला प्रगतीपथावर नेणे हे आहे. माझे काम हे बँकेला कुशल नेतृत्व देण्याचे आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी वडील गेले तेव्हा थोडी कठीण परिस्थिती होती. बँकेने ५०,००० हजार कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट समोर ठेवले होते आणि त्यावेळी बँकेचा व्यवहार होता सुमारे ३८,००० हजार कोटी. आम्ही सर्वांनी मिळून केलेल्या अथक प्रयत्नांनी ५०,००० हजार कोटींचे उद्दिष्ट तर केव्हाच पार झाले आणि आजच्या घडीला बँकेची उलाढाल 63,००० हजार कोटींच्या पुढे पोहोचलेली आहे. आज सारस्वत बँक ही सहकारी क्षेत्रातली भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि आणि सहकारी क्षेत्रातल्या इतर बँकांच्या आणि आमच्या बँकेमध्ये फार मोठी तफावत आहे. एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फक्त त्या क्षेत्रातले ज्ञानच असावे लागते असे नाही तर पारदर्शी नेतृत्वसुद्धा अत्यंत जरुरी असते." सहकारी क्षेत्रातल्या बँकांचा विषय निघालाच होता , म्हणून मी त्यांना विचारले," गौतमजी, सध्या सहकारी क्षेत्रातल्या काही बरीच मोठी नवे असलेल्या बँकांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चर्चा आहे आणि ह्यांत सामान्य खातेदार भरडला जात आहे. आपली बँक आपल्या खातेदारांना विश्वास देण्यासाठी काय असे वेगळे करत आहे?" ते उत्तरले, " खरे तर, आम्ही वेगळे असे काहीच करत नाही आहोत. जे, एका कुठल्याही चांगल्या वित्तसंस्थेकडून अपेक्षित आहे तेच आम्ही अंमलात आणत आहोत. संपूर्ण कारभारांत पूर्ण पारदर्शकता आणि मूल्यांचे जाणीवपूर्वक आणि कुठल्याही तडजोडीशिवाय केलेले पालन, हाच आमच्या विश्वासार्हतेचा पाय आहे आणि मी आणि आणि माझे सर्व सहकारी ह्या मूल्यांची अतिशय प्राणपणाने जपणूक करत असतो आणि म्हणूनच मी अगदी छातीठोकपणे माझ्या सर्व खातेदारांना हा विश्वास देऊ शकतो." ते बोलायचे थांबले पण त्यांना अजून काही तरी सांगायचे आहे असे मला जाणवले, त्यामुळे मी ही काही न बोलता तसाच थांबून राहिलो. आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी परत बोलायला सुरुवात केली. " तुम्हाला कल्पना आहेच की बँकिंग हा सेवा क्षेत्राचा भाग आहे. सेवा क्षेत्रांत, सगळ्यात मोठे अॅसेट म्हणजे त्या कंपनीतील माणसे. आमची सगळी गुंतवणूक ही आमच्या कर्मचाऱ्यांमध्येच असते आणि ह्यांच कारणामुळे, मी आमच्या बँकेचे एच. आर. डिपार्टमेंट माझ्या स्वतःच्या अखत्यारीतच ठेवले आहे. कर्मचारी प्रशिक्षण हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. बँकिंग क्षेत्रात येणारे नवनवीन प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान हे सर्व आत्मसात करण्याची संधी माझ्या सहकाऱ्यांना उपलब्ध करून देणे हे माझे खरे काम आहे. एव्हढच काय, पण बँकेत होणारी प्रमोशन्स सुद्धा योग्य रीतीने होत आहेत की नाही हे सुद्धा मी जातीने बघतो. तुम्हाला एक किस्सा सांगतो, मागच्याच वर्षाची गोष्ट आहे. त्यावर्षी साधारणपणे, ३०-३५ जागांसाठी प्रमोशन्स व्हायची होती. बँकेच्या नियमाप्रमाणे अंतर्गत परीक्षा झाली आणि त्यांत जेमतेम ७-८ लोकच ती परीक्षा पास झाले. हा निकाल घेऊन जेव्हा आमची मंडळी माझ्याकडे आली तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. मी तिथेच न थांबता थेट उमेदवारांशीच चर्चा केली आणि माझ्या लक्षात आले की बरीचशी मंडळी ही काही विशेष पद्धतीचे काम करणारी होती, जसे की एखादा ट्रेझरी बघत होता तर कोणी कर्ज विभागाचा होता आणि परीक्षा मात्र एखादी ब्रँच कशी चालवावी ह्यावर होती आणि त्यामुळे ही मंडळी जी वास्तविक आपापल्या कामात हुशार असूनसुद्धा नापास झाली होती. मग, मी परीक्षेचा पॅटर्नच बदलून टाकला आणि विभागवार परीक्षा घेण्यास सुरवात केली."
संध्याकाळचे सात वाजत आले होते. त्यांच्या भेटीसाठी थांबलेल्या किमान तीन लोकांची वर्दी तर माझ्यासमोरच त्यांना मिळाली होती. म्हणजे त्यांना कार्यालयातून निघायला कमीत कमी नऊ वाजणार होते. अर्थात, आजच्या व्यावसायिक जगात ही काही फार आश्चर्य करण्याची गोष्ट नव्हती. आज कॉर्पोरेट विश्वांत काम करणारी जवळपास प्रत्येक व्यक्ती दिवसाला १२-१४ तास काम करतच होती. पण, भारतातल्या सर्वात मोठ्या सहकारी बँकेचे चेअरमन असण्याचा ताण ती व्यक्तीच फक्त जाणू शकते. साहजिकच,हा ताण हलका करण्यासाठी ते काय काय करतात ह्या प्रश्नावर ते म्हणाले." मी वाचन करतो. पुस्तके वाचतो. कितीही उशीर झाला तरी, किमान एक तास वाचन झाल्याशिवाय मी झोपत नाही. वडिलांच्या कृपेने, माझ्या घरीच जवळपास १०,००० पुस्तकांचे एक छोटेसे ग्रंथालय आहे. मनावरचा ताण हलका करण्यासाठीचा हा माझा अगदी सिद्ध उपाय आहे . इतर आवडी-निवडी म्हणाल, तर मला जागतिक सिनेमाची खूप आवड आहे. पोलिश, रशियन, जपानी अश्या अनेक भाषांमध्ये निर्माण होणाऱ्या दर्जेदार चित्रपटांचे महोत्सव मी सहसा कधी चुकवत नाही. "
मी संगीताच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रायोजक म्हणून सारस्वत बँकेचे नाव पहिले होते. त्यामुळे, निघता निघता मी त्यांना त्याबद्दल छेडले. ते म्हणाले," आमची बँक अश्या अनेक कार्यक्रमांना आणि कलाकारांना प्रायोजित करते, आणि फक्त संगीताच्या क्षेत्रातच नव्हे तर कलेच्या इतर क्षेत्रांमध्येही आमची बँक अश्या प्रकल्पांच्या मागे उभी असते. त्याचप्रमाणे चांगली कामे करणाऱ्या सामाजिक संस्थांनासुद्धा आम्ही आमच्या परीने मदत करत असतो. एकाच प्रकल्पावर मोठा खर्च करण्यापेक्षा, अनेक लोकांपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमची मदत ही कायम स्वरूपी आणि अर्थपूर्ण असण्यावर आमचा कटाक्ष असतो. बरे अशी कामे करत असताना, आमची बँक अजिबात प्रसिद्धीचा हव्यास धरत नाही. 'ताज'च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले स्व. तुकाराम ओंबळे तुम्हाला आठवत असतीलच. त्यावेळी एक रक्कम त्यांच्या कुटुंबाला देण्याऐवजी आम्ही त्यांच्या मुलाला बँकेच्या सेवेत सामावून घेतले ज्यायोगे कुटुंबाला एक कायमस्वरूपी आधार मिळाला. " थोडा वेळ थांबले आणि मग म्हणाले," गेटवे ऑफ इंडियावर जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा एखाद्या अंधाऱ्या घरात पणती लावणे ह्यावर आमच्या बँकेचा जास्त विश्वास आहे. “
एका अतिशय संयत आणि संवेदनाशील व्यक्तिमत्वाच्या सहवासाने, थोडयाश्या भारावलेल्या मनस्थितीतच , तळमजल्यावरच्या विठ्ठलमूर्तीचे दर्शन घेऊन सारस्वत भवनाच्या बाहेर पडलो. ह्या भेटीच्या स्मृतींचा दरवळ कायम मनात राहील.