संपादकीय

DSC 1002गेल्या १५ वर्षात चीनने जेवढी प्रगती केली, त्याने संपूर्ण जगच स्तिमित झाले. चीनच्या प्रगतीचा वेगच भल्याभल्यांना चकित करणारा होता. महाकाय देश, भरपूर लोकसंख्या, ह्याचा पुरेपूर उपयोग त्या देशाने करून घेतला. किंबहुना प्रगत जगाची आंधळेपणे नक्कल न करता चीनने आपले स्वतःचे असे वेगळे अर्थकारणाचे मॉडेल तयार केले. राजकीय दृष्ट्या कम्युनिस्ट राजवट पण आर्थिक क्षेत्रात मात्र उदारीकरण असे हे समजायला, पचायला कठीण पण अत्यंत परिणामकारक असे हे मॉडेल होते. गेली तीन दशके चीन ह्याच मोडेलच्या आधारे आपली प्रगती साधत आहे.
चीनची अर्थव्यवस्था ही गुंतवणूक प्रधान समजली जाते. ह्याचाच अर्थ विनियोगाचा विचार न करता मोठे मोठे प्रकल्प आणायचे म्हणजे विनियोग आपसूकच वाढतो अशी ही विचारप्रणाली आहे. गेली अनेक वर्षे ह्या विचार प्रणालीला यश मिळत आहे असे चित्र जगापुढे उभे करण्यात चीन बहुतांशी यशस्वी झाला होता पण गेल्या एक दोन वर्षात हे चित्र बदलायला लागले. चीनच्या प्रगतीचा वेग मंदावला. गेल्या दशकभर १० च्या वर असलेला अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग प्रथमच सात आठ च्या आसपास फिरू लागला. ह्यातूनच 'गुंतवणूक प्रधान अर्थव्यवस्थेपेक्षा विनियोग प्रधान अर्थव्यवस्थाच जास्त स्थिर असून जास्त काळ टिकू शकते!' हे तत्व पुढे आले. चीनची अर्थव्यवस्था सध्या ह्याच स्थित्यंतरातून जात आहे. उत्पादनांचा देशांतर्गत उठाव कमी झाल्यामुळे साहजिकच चीनची निर्यात वाढू लागली व ह्याचाच वाईट परिणाम इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर हळूहळू दिसू लागला आहे.
भारताला मात्र चीनचा धसका घ्यायचे कारण नाही कारण आपला आंतरराष्ट्रीय व्यापार मर्यादित आहे आणि त्याचबरोबर देशांतर्गत उत्पादन व मागणी ह्यात समतोल आहे. पंतप्रधानांनी याच महिन्यात उद्घाटन केलेल्या 'डिजिटल इंडिया'सारख्या उपक्रमाचे उद्योगक्षेत्राकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे. यामुळे वाढत्या गुंतवणूकीची व रोजगार निर्मितीची दालने खूली होण्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यापुरते बोलायचे झाले तर 'डिजिटल इंडिया'च्या बरोबरीनेच 'मेक इन महाराष्ट्र', 'स्मार्ट सिटी' सारख्या योजनांची योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे दर्जेदार पायाभूत सोयीसुविधा, पुरेशी वीज, कुशल मनुष्यबळ आणि पर्यावरण व प्रादेशिक अस्मिता ह्यांचा समतोल राखणारे औद्योगिक धोरण या पाठबळावर आपण उत्पादनक्षेत्रात लक्षणीय प्रगती करू शकतो. कारण शेवटी वाढते उत्पादनक्षेत्र हेच निरोगी अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे आणि तेच आपल्याला अंत्योदयाकडे नेऊ शकेल याची आम्हाला खात्री वाटते!!!

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division