भारतीय उद्योजकतेची कथा आणि व्यथा – भाग १

- विश्र्वास प्र. पिटके

Indian Industryजगाचा एकूण व्यापार बघता त्यामध्ये भारतीय उद्योजकांचा वाटा नगण्य का आहे हे आपण समजावून घेऊ. मुळात भारतात उद्योजकता ही राष्ट्रीयतेच्या भावनेतून किंवा सामाजिक भावनेतून उदयास आलेली आहे. या उद्योजकतेच्या मागे औद्योगिक क्रांती किंवा प्रखर भांडवलशाही नव्हती आणि प्रखर चंगळवादी समाज पण नव्हता. त्यामुळे कसलीही विशेष स्पर्धा न करता ‘सरकारी सामंजस्याने’ आपल्या ह्या देशातील उद्योजकता फक्त भारतातील जनतेसाठीच उभी राहिलेली आहे. साहजिकच, मुद्दाम आटापीटा करून व स्पर्धा करून जगाच्या व्यापारात भाग घेणे व महत्त्वाचे स्थान पटकावणे हा महत्वाकांक्षी विचार आपल्या उद्योजकांच्या मनात आलेला नाही.

ब्रिटिश गेल्यानंतर, स्वतंत्र भारत सरकारने, नियोजन आयोगाची (Planning Commission) स्थापना करून, प्रथम आपल्या देशातील जनतेला कोणकोणत्या वस्तू किती प्रमाणात लागतील याचा आढावा घेतला. त्यानंतर फक्त तेवढ्याच वस्तू आपल्या देशात उत्पादित केल्या जातील याची खबरदारी घेतली. असे होण्यासाठी, इच्छुक उद्योजकाला एखादी वस्तू फक्त ठराविक संख्येतच उत्पादित करता येऊ शकेल असा ‘परवाना’ घेण्याची सक्ती करण्यात आली. हेच ते ‘लायसंस राज’. उद्योजकास ही इष्टापत्तीच होती. यामुळे त्याच्या उत्पादनास बाजारपेठेची एक प्रकारे हमीच मिळाली. अशा प्रकारे कसलीही स्पर्धा न करता इथल्या उद्योजकांना सहज उद्योगपती होता आले. त्यामुळेच, त्याकाळी सरकार दरबारी ज्या श्रीमंत घराण्यांचे वजन होते त्याना विनासायास उद्योजकतेचे हे घबाड, कोणाशीही कसलीही स्पर्धा न करता,आयतेच मिळाले. यामुळेच पैसे देउन हवा तो परवाना मिळवणे किंवा इतरास तो मिळू न देणे या उपद्व्यापामुळे सरकार दरबारी भ्रष्टाचार वाढला. परिणामी, खराखुरा उद्योजक मागेच पडला आणि उद्योजकता नसलेले धनदांडगेच उद्योजक म्हणून मोठे झाले. हे सर्व उद्योजक जर त्या काळी परदेशात असते तर अशा प्रकारे परदेशात कधीच यशस्वी झाले नसते.

या तथाकथीत उद्योजकांनी भारतदेशाची बाजारपेठ एकमेकाशी अजिबात स्पर्धा न करता व्यवस्थित आपापल्यात वाटून घेतली. त्यानंतर जनतेची व ग्राहकाची जराही पर्वा न करता व वस्तुच्या गुणवत्तेची फारशी चिंता न करता आपल्याला जे सोयीचे वाटते असेच उत्पादन ग्राहकाच्या गळ्यात मारत बरीच दशके गेली. यामुळेच फियाट आणि अॅाम्बेसेडर कार आणि तिरकी करूनच सुरू होणारी बजाज दुचाकी आपल्याला बरेच दिवस वापरावी लागली. इतकेच नव्हे तर त्यासाठी चक्क आगाऊ रक्कम भरून त्यानंतर आपला क्रमांक येईपर्यंत बरीच वर्षे वाट पण बघावी लागली. अशा प्रकारे एकदा धंद्याचे बस्तान बसले की मग पैसाच पैशाकडे जातो या उक्तीनुसार या उद्योजकांची वाढ होत गेली. यामुळेच, भारतात तोच उद्योजक झाला की जो आधीच श्रीमंत होता व ज्याने सरकारी लाल फीत कशी कापायची याची तजवीज केलेली होती. त्यामुळे अशा उद्योजकाला कारखानदारीचे, विक्रिकौशल्याचे, ग्राहकाभिमुखतेचे फारसे ज्ञान नसले तरीही फारसे काही बिघडत नव्हते. समाजवादी महात्मा गांधींच्या मांडीला मांडी लावून बिर्ला, सिंघानिया, बजाज व बरेच गुजराती आणि मारवाडी समाजातील धनिक अशा पद्धतीने भांडवलशहा म्हणून मोठे झाले. या सर्व उद्योजकानी जनतेला लागणार्यात जीवनावश्यक वस्तु उत्पादन करण्याचा किंवा किरकोळ विक्रीचा साधा व कोणतीही जोखीम नसलेला किंवा विक्रीकौशल्य दाखवण्याची विशेष कसलीही गरज नसलेला किंवा टंचाईसदृश्य धंदाच स्वीकारला व भारतात स्वतःचे बस्तान बसवले.

याचवेळी टाटा, गोदरेज या सारखी दर्जेदार उद्योजक घराणीपण आपणास लाभली. महाराष्ट्रात जसे किर्लोस्कर, गरवारे, गोगटे, ओगले यासारखे फक्त स्वकर्तृत्वावर घडलेले उद्योजक निर्माण झाले तसेच इतर बऱ्याच राज्यात पण निर्माण झाले. पण असे असूनही जगात यापैकी कोणाचाही दबदबा निर्माण झालाच नाही. आजही भारत देशात आपण अभिमान वाटेल असे स्वतःचे चार चाकी वाहन निर्माण करू शकलो नाही याची जाणीव असावी. मोरारजी देसाई तर चक्क संसदेत म्हणाले होते की आपल्या भारतीय उद्योजकाने उत्पादित केलेल्या दाढीच्या ब्लेडने साधी दाढी पण करता येत नाही.

आज मोठे वाटणारे अम्बानींसारखे उद्योजक मुळातच वस्त्रधाग्याच्या किरकोळ व्यापारातून पुढे सरकारी संगनमताने पार तेल आणि उर्जा उद्योगापर्यंत जरी आले तरी देशाबाहेर त्यांचा कोणताही अभिमानास्पद असा जागतिक किर्तीचा उद्योग नाही. मुळात ज्या क्षेत्रात सरकारी संगनमताने मक्तेदारीचा फायदा करून घेता येईल व ग्राहकाभिमुखता आणि विक्रिकौशल्याची कसलीही गरज नसेल अशाच टंचाईसदृश्य धंद्यात त्यांना रस आहे. यामुळेच त्यांना अजुनही ’रिलायन्स फ्रेश’ सारखा भाजी बाजार चालवणे पण जमलेले नाही. तसेच त्यांना ग्राहकाभिमुख होऊन स्पर्धेत उतरून साधा मोबाईल फोन पण विकता आलेला नाही. आज जगात 688 कोटी मोबाईल फोनधारकआहेत. यातील105 कोटी धारक एकट्या भारतात आहेत. पण तरीही एकाही स्वदेशी उद्योजकाला यासाठी स्वदेशातच स्मार्ट्फोन निर्माण करून भारतातील ही बाजारपेठ काबीज करावी असे काही अजून तरी वाटलेले नाही. मग जगाला गवसणी घालणे तर फारच दूरची गोष्ट आहे. याउलट, दुरसंचारसेवा आणि आंतरजालसेवा पुरवण्यात मात्र सर्वानाच रस आहे कारण तो जवळपास मक्तेदारिचाच धंदा आहे.

अबुधाबीसारख्या छोट्याआखाती देशात जेव्हा 800 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाची निविदा, 2016 मधे, जाहीर केली जाते त्यावेळी जागतिक किर्तीच्या कमीतकमी 200 खासगी उद्योजकांची तेथे रांग लागते. या रांगेत एकही भारतीय उद्योजक नसतो. यामधील फार फार तर 20 उद्योजकांना पात्र ठरवले जाते आणि यापैकी फक्त एकाचीच सर्वात कमी किमतीची वीज् विक्रीची निविदा स्विकारली जाते. अबुधाबी सरकारने यावेळी अशा वीजेची खरेदी 2.42 सेंट्स प्रती युनीट, म्हणजे फक्त 1.62 रूपये प्रती युनिट या भावाने केलेली आहे. याचवेळी, भारतात अदानी या आपल्या तथाकथीत उद्योगपतीने, तामिळनाडुमधे 650 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जेचा प्रकल्प स्थापून, आपले सरकार दरबारी असणारे वजन वापरून, तामिळनाडू सरकारकडून 7.45 रूपये प्रति युनीट असा घसघशीत भाव कसल्याही निविदात्मक स्पर्धेशिवाय पदरात पाडून घेतला आहे. भारतातच असा सुगम पद्धतीने धंदा करता येत असताना अदानी कशाला जगाच्या स्पर्धेत उतरेल?

भारतात एकगठ्ठा भरपूर धंदा करणार्याे सुझलॉन सारख्या भारतीय पवनचक्क्य्या निर्माण करणार्या संस्थेस जागतिक बाजारपेठेत कोणीही साध्या प्राथमिक चर्चेला पण बोलावित नाही. याउलट जनरल ईलेक्ट्रिक (जीई) सारखी अमेरिकन संस्था सौदी अरेबियाच्या मोठ्या बाजारात शिरकाव करण्यासठी 3 मेगवॅट क्षमतेचा पवनउर्जा प्रकल्प स्वखर्चाने स्थापून त्या देशाला भेट म्हणून अर्पण करते. अशी महत्वाकांक्षी खेळी भारतीय उद्योजक कधी खेळणार?

वाहन उद्योगाला लागणार्या सुट्या भागांचे उत्पादन करून जवळपास 1000 कोटी रूपये एवढे वार्षिक उत्पन्न असणार्या एका संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना (की ज्यांचे स्वतःचे त्याचाच संस्थेमधे 50% मालकीहक्क पण आहेत) एका रशियातील संस्थेबरोबर, सर्वतोपरी भावेल अशी, भागीदारीची संधी मी स्वतः आणून दिली. प्रत्यक्ष बोलणी करण्यासाठी रशियाला जाण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळी लाजत लाजत मला या ‘श्रीमंत उद्योजकाने’ विचारले की ते लोक आपली जायची-यायची विमानाची तिकिटेपण काढून देतील काय? किती ही भुक्कड मनोवृत्ती ! याच सदगृहस्थांना मी दक्षिण कोरियातील एका संस्थेबरोबर उद्योगाची संधी आणून दिली असता या कोरियाच्या संस्थेने घातलेल्या अटीनुसार पहिल्याप्रथम फक्त 40 लाख रूपयांचा माल त्या संस्थेकडून विकत घेऊन भारतात आणून विकायची हिम्मत आपल्या या देशी उद्योजकाला झाली नाही. 40 लाख रूपयांची पण जोखीम न घेण्याची ही वृत्ती कशी चालेल?

भरपूर मोठा असणारा भारतीय औषधनिर्मिती उद्योग हा फक्त इतर परदेशी संस्थानी संशोधन करून निर्माण केलेली पण भारतात कमी किमतीत बनणारी सर्वसामान्य / जेनेरिक औषधेच निर्माण करण्यातच गुंतलेला आहे. संशोधनावर आपला खर्च शून्य. स्वस्तात औषधे बनवणारा देश हेच काय ते आपले महत्त्व.

आयबीएम, अॅिक्सेंचर, मायक्रोसॉफ्ट यासारख्या जागतिक दर्जाच्या माहिती तंत्रज्ञानातील संस्थांची आणि त्यांच्याच ग्राहकांची फक्त उष्टी-खरकटी काढून आपल्या देशातील टाटा, इंफोसिस व विप्रो सारख्या संस्था खोर्याने पैसे मिळवितात पण आपण विंडोज सारखे एखादे उत्पादन तयार करून जगात स्पर्धेत उतरावे असे या संस्थाना वाटत नाही. त्यामुळेच भारतीय कर्मचार्यायला जगात कमीत कमी खर्चावर काम करणारा एक तांत्रिक हमाल (Technical Coolie) असे म्हणूनच हिणवले जाते. सिनेमाची, रेल्वेची, बसची तिकीटे आरक्षित करण्याची व इतरही बरीच फुटकळ अशी अॅीप्लीकेशन्स बनवण्यापेक्षा फेसबुक, लिंक्ड-इन, व्होट्सअॅप सारखी सर्व जगाला बांधून ठेवणारी अशी अॅप्लीकेशन्स आपल्या भारतीय सॉफ्टवेअर अभियांत्रिकांना का नाही सुचत? याच इंफोसिसचे एक संचालक, त्यांच्याकडे जवळपास रूपये 7000 कोटीं एवढी संपत्ती असूनही, कसलीही कारखानदारी किंवा तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग किंवा काहीही नाविन्यपूर्ण न करता, अमेरिकेत 700 सदनिका विकत घेतात आणि अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट संस्थेमधील कर्मचार्यांना घरे भाड्याने देण्याचा मध्यमवर्गीय मानसिकतेचा साधा सोपा पैसे मिळवण्याचा मार्ग निवडतात. तेव्हाच अशा तथाकथित श्रीमंत यशस्वी (?) भारतीय उद्योजकाची जागतिक स्तरावरील योग्यता कळून येते. जोखीम न घेणे हेच काय ते धोरण. मग राजे कधी होणार? कायमच गुलामगिरी नशीबी येणार. म्हणूनच अमेरिकेने व्हिसा देण्याचे धोरण बदलले की आपल्या शेअर-बाजारावरील तोरण उतरते.

ईस्त्राएल ने बंडखोरी करून डी बीअर्स या जगातील सर्वात बलाढ्य हिरे व्यापार करणार्या संस्थेच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान दिले. यामुळे चिडून जाऊन आणि सावध होउन डी बीअर्स ने त्यांचा ईस्त्राएलला दिलेला कच्च्या हिर्यांना पैलु पाडण्याचा सर्वच धंदा बंद करून तो भारताच्या झोळीत टाकला. पण त्यामुळे भारतीय हिरे व्यापार्यांना अकारण असे वाटते कि हा आपल्याच कर्तबगारीचा प्रताप आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही.

मारवाडी आणि उडुपी समाजातील एकमेकाना मदत करण्याच्या रिवाजामुळे जरी त्यांच्या समाजाचेच उद्योजक जास्त दिसत असले तरी यामधील कोणीही जागतिक स्तरावर आलेला नाही. याचे कारण म्हणजे जागतिक स्तरावर कोणाच्याही मदतीशिवाय स्वबळावरच स्पर्धा जिंकूनच स्वतःला सिद्ध करावे लागते. त्यामुळेच ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या धोरणामुळेच उद्योजक म्हणून पुढे आलेले हे सर्व उडुपी उद्योजक अजूनही जागतिक स्तरावर मॅक्डोनाल्ड सारखी आपली खाद्यपेयगृहाची श्रुंखला काढू शकलेले नाहीत हे एक विदारक सत्य आहे. श्री विठ्ठल कामतानी बऱ्याच अंशी असा प्रयत्न, निदान भारत देशापुरता का होइना, पण केला. पण तोही काही तितकासा यशस्वी झालेला नाही. मात्र असा व्यापक दृष्टीकोन ठेवल्यामुळे त्यांच्याबद्दल आदराची भावना नक्कीच निर्माण होते. असे उद्योजक हवेत. भारतातल्या एकाही गुजराती किंवा मारवाडी उद्योजकाला आजपर्यंत अमेरिकेच्या ‘वॉल्मार्ट’ची बरोबरी करता आलेली नाही. एकमेकाना मदत करूनच जर उद्द्योग वाढविणे अभिप्रेत असते तर अमेरिकेतून माहिती-तंत्रज्ञानाचा उद्योग भारत देशात आला असता काय? अमेरिकेतील किंवा युरोपातील उद्योगपतीनी तो त्यांच्याच जातभाईना किंवा देशवासियांनाच दिला नसता काय? परदेशात अशा व्यावसायिकतेच्या बाबतीत स्वतःच्या सख्या भावाला देखील सहानुभूती दाखवली जात नाही. गुणवत्तेत तडजोड केली जात नाही. असे भारतात होईल काय? मग आज डोनल्ड ट्रम्प यानी ’स्वदेशी’ची घोषणा केल्यावर आपल्या उद्योजकाला ते का नाही पटत?

अमेरिकेतील गुजराती पटेलांचे त्यांच्या मोटेल (रस्त्यावरून जाणार्या वाहनचालकांसाठी आणि वाटसरुंसाठी रात्रीच्या निवार्यासाठीचे स्वस्तातील हॉटेल) व्यवसायातील यशाबद्दल भारतात कितीही कौतुक होत असले तरीही अशा कोणाही पटेलाची तेथील प्रख्यात हॉटेल व्यावसायिकामधे उठबस नाही किंवा कोणाही पटेलाची तेथे पंचतारांकीत हॉटेल व्यवसायात ठसा उमटविणारी उपस्थिती नाही किंवा साधी चर्चापण नाही. वरचष्मा असणे तर दूरच. साहजिकच या सर्व पटेलांच्या अश्या ह्या उद्योजकतेचे कौतुक फक्त त्यांच्या स्वतःच्या आर्थिक स्वयंपूर्णतेपुरतेच मर्यादीत आहे.
असाच निराशाजनक प्रकार भारतातील इतर उद्योग क्षेत्रात आहे. थोडक्यात म्हणजे ’आहे मनोहर तरी गमते उदास’ अशीच भारतीय उद्योगाची परिस्थिती आहे. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे (World Trade Organisation) सभासदत्व स्विकारून परदेशी संस्थाना आपला देश उद्योगधंद्यासाठी खुला केलेला आहे. याचा फायदा परदेशी संस्थानीच घेऊन भारतात आपले बस्तान बसविले आहे. पण हाच प्रकार आपल्या भारतीय संस्थाना परदेशात जाऊन करता आलेला नाही. गाजावाजा करून विकत घेतलेली कोरेस ही युरोपातील संस्था विकून टाकायची वेळ टाटांवर आलेली आहे. टाटा मोटर्स सारख्या प्रख्यात संस्थेवर स्वतःचा आपल्याच देशातील नॅनो प्रकल्प बंद करायची वेळ आलेली आहे. आज टाटा मोटर्स, जग्वार आणि लॅन्ड रोव्हर यांना लागणार्या सुट्या भागाचा पुरवठा करीत आहे. पूर्वी आपल्या देशात दुरचित्रवाणीसंच उत्पादन करणारी आघाडीची व्हिडीओकॉन ही संस्था आज जागतिक दर्जाच्या परदेशी संस्थाना सुटे भाग पुरवून स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे. आपल्या देशात येऊन आपलीच बाजारपेठ या परदेशी उद्योजकांनी काबीज केलेली आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे आणि जग जिंकायची महत्वाकांक्षा आहे. मुठभर ज्यु आणि पाश्च्यात्य उद्योगपती आज जगाचा व्यापार नियंत्रित करीत आहेत. हे भारतीय उद्योजक कधी करणार?

आपल्या देशातील सर्वच उद्योजक हे जागतिक पटलावर फक्त दुय्यम किंवा त्याहीपेक्षा खालील पातळीवर काम करीत आहेत. अपवादात्मक काही अभिमानास्पद उदाहरणे आहेतही पण आज तेवढेच पुरेसे नाही. त्यामुळे केवळ भारतात धंदा करून, होम पीचवर वाटेल तशी बॅटिंग करून, तसेच परदेशी संस्थांचे मांडलिकत्व पत्करून भरपूर पैसे मिळतात हे कारण आज पुरेसे नाही. महत्त्वाचे म्हणजे हा काही नुसता स्वाभिमानाचा प्रश्न नाही तर प्रत्यक्ष आपल्या उद्योगविश्वाच्या अस्तित्वाचाच आणि प्रत्येक भारतीयाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. आपल्या संशोधनावर आधारीत, अवघड तंत्रज्ञान आत्मसात करून किंवा काहीतरी मूल्यवर्धित कल्पनेचा (Value Added) वापर करून जर आपण यापुढे जगाचे नेतृत्व करणारे उद्योगधंदे केले नाहीत तर सदैव आपली अर्थव्यवस्था परदेशी अर्थव्यवस्थेवरच अवलंबून राहील. येथेच लहान किंवा मध्यम उद्योगाचे महत्व जाणवते. कारण नवनिर्मिती येथूनच होण्याची जास्त शक्यता असते. शेतीवर आधारीत अन्नधान्याचे मूल्यवर्धन करणारे उद्योगधंदे फार मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. शेती क्षेत्राकडे आपले आजही दुर्लक्ष झालेले आहे.

उद्योजकता म्हणजे Entrepreneurship (आंत्रप्रुनियरशीप). उद्योजक म्हणजे Entrepreneur ( आंत्रप्रुनियर). 'आंत्रप्रुनियर' हा शब्द इंग्रजी जरी असला तरी त्यांचे मुळ फ्रेंच भाषेमध्ये आहे. या शब्दाचा अर्थ आहे 'अशी व्यक्ती जी जोखीम घेते'. उद्योजकाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' घेणे. बरेच उद्योजक व्यवसायाच्या सुरूवातीलाच केवळ नाइलाजच असतो म्हणून जोखिम घेतात. थोडेफार यशस्वी होतात. परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखिम घेणे थांबवतात. नवीन संधीचा शोध घेत नाहीत. नवीन निर्मिती करत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. बचावात्मक पवित्रा घेतात. पैशाअभावी ते जर नाईलाजाने असे करीत असतील तर ते समजण्यासारखे आहे. पण जे उद्योजक श्रीमंत झालेले असतात ते आहे तीच श्रीमंती कमी होईल या भीतीने धोपटमार्ग सोडतच नाहीत. असे उद्योजक फक्त कागदावरच उद्योजक असतात. मानसिकतेने ते निवृत्त उद्योजक किंवा ‘पगारी उद्योजक’ असतात. माहिती तंत्रज्ञानातील उद्योजक, वाहन उद्योगाला सुटे भाग पुरविणारे उद्योजक, औषध विक्रेते, सर्वसामान्य व जीवनावश्यक वस्तुंचे उत्पादन करणारे उद्योजक हे अशांचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या या उद्योजकानी आतापर्यंत जी प्रगती केलेलीआहे ती त्यांच्या वैयक्तिक पातळीवर कौतुकास्पद आहे. पण यात त्यांच्या ’उद्योजकतेचा’ खरा कस (Acid Test) लागलेला नाही.

व्यवसायात अग्रेसर राहण्यासाठी उद्योजकांनी सातत्याने 'अर्थपूर्ण जोखिम' घेणे गरजेचे आहे. जो जोखिम घेतो तो उदयोजक! हे सूत्र लक्षातठेवले पाहिजे. या उलट, भारतीय उद्योजक हा जितका मोठा होत जातो तितकी त्याची जोखीम घेण्याची आणि नवे काही करण्याची इच्छाच निघून जाते. पण इतके असूनही असे उद्योजक तोच तो धंदा करून दरवर्षी भरपूर माया जमवित असतात व त्यामुळेच हे सर्व उद्योजक फारच यशस्वी आहेत असा सामान्य जनतेचा भाबडा गैरसमज होतो. यांची कारणे खालील प्रमाणे- 

1) सरकारी संगनमताने धंद्यात सहज होणारा शिरकाव
2) भ्रष्टाचारामुळे धंद्यात सहज मिळणारे यश
3) नियमांना वाकवून किंवा मोडून भारतातच सहज मिळणारा भरपूर नफा
4) भारताच्या प्रचंड लोकसंख्येमुळे देशांतर्गत बाजारपेठेची निश्चिती
5) भारतीय ग्राहकपण शक्यतो आपली आवड सहजासहजी बदलण्याची जोखीम घेत नाही. त्यामुळे जुन्याच व प्रस्थापित उद्योजकांनाच फायदा होतो. नवोदित उद्योजकाची गोची होते.
6) ग़ुणवत्तेला आणि नैतिकतेला फारसे प्राधान्य न देता फक्त भरपूर मिळवता येणार्या नफ्यावरच लक्ष
7) भारत देशाच्या बाहेर धंदा करण्याची महत्वाकांक्षाच नसणे.
8) स्पर्धा करण्यात रस नसणे

अशा प्रकारे भारत देशात बुद्धिमत्तेकडे, गुणवत्तेकडे किंवा धाडसीपणाकडे पैसा न जाता फक्त पैशाकडेच पैसा जात राहिल्यामुळे सज्जन व नीती-नियमाने काम करणार्या व नव्या दमाच्या लघु आणि मध्यमक्षेत्रातील इतर होतकरू उद्योजकांना यामुळे भारतात पण मोठे होण्याची फारशी संधीच मिळत नाही. म्हणूनच भारतात उत्साहाने नव्याने उद्योग सुरू करणे यास पोषक वातावरण नाही. आजही आपल्याकडे असे कितीतरी लघु आणि मध्यम क्षेत्रातील बुद्धिमान आणि तडफदार उद्योजक आहेत ज्यांना पोषक वातावरण मिळाले तर ते मोठे होऊन जग जिंकतील. पण लक्षात कोण घेतो? येथे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवतो.

बहुराष्ट्रीय संस्थासमोर टिकायचे असेल तर भारतीय उद्योजकांनी कोणते उपाय योजले पाहिजेत याविषयी जाणून घेऊ पुढील भागात.

 

- विश्र्वास प्र. पिटके

+91 9011092781

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division