'ऐतिहासिक वास्तुंचे जतन करताना संवेदनशीलता महत्त्वाची!'

- चेतन रायकर,

अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक

'स्ट्रक्टवेल डिझायनर्स अॅंड कन्सलटंट्स प्रा.लि.'

chetan raikar२६ नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि त्यावेळी झालेली अपरिमित हानी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. तो दिवस आठवला की ताज पॅलेसमधून उठणारे धुराचे लोट आणि आगीचे तांडवही कोणी विसरलेले नाही. आज मात्र ती वास्तु पुर्वीच्याच दिमाखात उभी असलेली दिसते. केवळ ताजच नाही तर गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा मोरवी येथील राजवाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तुंना पुनरुज्जीवन देण्याचे काम 'स्ट्रक्टवेल डिझायनर्स अॅंड कन्सलटंट्स प्रा.लि.'या कंपनीतर्फे करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, बंगरूळु आणि दुबई इथल्या शाखांमार्फत या कंपनीचा विस्तार होत आहे. या कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक चेतन रायकर यांच्याशी बातचित करत आहेत चित्रा वाघ.

१. आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय आहे आणि आपण त्याकडे कसे वळलात?

माझे वडील कै. रमेश रायकर यांनी 'स्ट्रक्टवेल डिझायनर्स अॅंड कन्सलटंट्स प्रा.लि.'या इंजिनिअरिंग कन्सलटन्सी कंपनीची स्थापना केली. गेल्याच महिन्यात या कंपनीने ५० वर्षे पूर्ण केली. घरचा व्यवसाय असल्याने सहजच या क्षेत्राकडे वळलो. सिव्हिल इंजिनियरींग पूर्ण करून गेल्या ३० वर्षांपासून मी या व्यवसायात कार्यरत आहे. डिझायनिंग, इंजिनियरींग, मटेरियल टेस्टिंग, आर्किटेक्चर, स्ट्रक्चरल ऑडीट अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही काम करतो.अनुभवी आणि प्रशिक्षित इंजिनिअर्स, आर्किटेकट्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्टसच्या मार्फत हे काम केले जाते. सुरुवातीच्या काळात पालिकेच्या स्तरावर काम केले जायचे. आता मात्र मुख्यत्वेकरून कॉर्पोरेट स्तरावर आम्ही काम करतो. पुरातन वास्तुंचे जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार करणे हा यातील महत्त्वाचा भाग आहे. याविषयातले औपचारिक प्रशिक्षण घेण्यासाठी मी स्कॉटलंड येथील हेरियट-वॅट युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स डिग्री घेतली.याआधीही अनेक वर्षे वाचन, निरिक्षण, अभ्यास आणि अनुभवाच्या आधारे हे काम आम्ही करत होतोच.

१९९९ मध्ये मुंबईतल्या फाउंटन परिसरातील स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंकेच्या पुरातन इमारतीचे पुनरुज्जीवन आम्ही केले. त्या कामाची टाइम्स ऑफ इंडियासारख्या वर्तमानपत्राने दखल घेतली. अनेक स्तरांवर कौतुक झाले. त्यानंतर अशा प्रकारच्या प्रकल्पांचा सल्लागार म्हणून मी काम करू लागलो. यानंतर गेटवे ऑफ इंडिया, ताज पॅलेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस अशा अनेक महत्त्वाच्या वास्तुंचा जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली.

२. पुरातन वास्तु पुनरुज्जिवित करतानाचे टप्पे कोणकोणते असतात?

cstकुठल्याही पुरातन वास्तुचा जीर्णोद्धार करताना एक बाब समजून घेणे आवश्यक आहे की हे सौंदर्यीकरण किंवा नूतनीकरण नसून संवर्धन किंवा जतन करणे आहे. त्या वास्तूची पडझड किंवा झीज थांबवणे, तुटलेला भाग किंवा भेगा पूर्ववत करणे अशा प्रकारचे ते काम आहे. त्या वास्तूचे प्राचीन किंवा मूळ रुप बदलणे, त्याला रंगरंगोटी करणे हे यात मुळीच बसत नाही. ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्यासाठी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असते. इंजिनिअरिंगच्या किंवा आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात ह्या गोष्टींवर फारसा भर दिला जात नाही. हे सगळं पुस्तकं वाचून, चर्चा करून, अभ्यास करून शिकावं लागतं.

मुळात पुरातन वास्तुंचे आराखडे कुठेही उपलब्ध नसतात. त्यामुळे प्रथम संपूर्ण इमारतीचे मोजमाप घेऊन बारिकसारिक तपशीलांसकट नवीन आराखडा तयार करावा लागतो. कुठल्या भागात काम करण्याची आवश्यकता आहे किंवा बांधकाम कमकुवत झाले आहे याचे बरेचसे अंदाज निरिक्षणावरून बांधावे लागतात. हे म्हणजे एखाद्या पेशंटने आपल्या आजाराविषयी काहीही न बोलता डॉक्टरसमोर उपचारासाठी उभं राहाण्यासारखं असतं. मग यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्या किंवा परिक्षण केले जाते. त्याखेरीज प्रत्येक वास्तुची एक देहबोली असते. त्याचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. तत्कालीन बांधकामाची पद्धत, तेव्हा वापरण्यात आलेला माल यांची नोंद करावी लागते. त्यानंतर कुठल्या भागात काम करण्याची गरज आहे, कुठल्या प्रकारची डागडुजी करायची याची सविस्तर यादी करून त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधला जातो. पुढे वास्तुच्या मालकाच्या परवानगीने कंत्राटदाराची नेमणूक करून हे काम सक्त देखरेखीखाली पूर्ण केले जाते. ज्या इमारतीचे काम करत असू त्याची योग्य दुरुस्ती करणे आणि यापुढची पडझड थांबावी म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करणे हे काटेकोरपणे करावे लागते. याबाबतीत माझ्या वडिलांनी दिलेली एक शिकवण मी नेहमी लक्षात ठेवतो. ते म्हणत,"आपण वास्तुसाठी काम करत असतो. तिचा मालक बदलू शकेल, त्या इमारतीचा कसा वापर करायचा ही दृष्टी बदलू शकेल पण वास्तुची गरज तीच राहणार आहे. ती गरज ओळखून आणि तिच्याशी प्रामाणिक राहून काम केले पाहिजे.'

३. व्यवसायादरम्यान आलेले काही वेगळे अनुभव?

taj mahal hotelप्रत्येक कामाच्या वेळी वेगवेगळे अनुभव येतात. माणसांचे तर येतातच पण निर्जीव इमारतींचेही येतात. ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा वास्तुंसाठी काम करताना अनेकदा आपल्याकडे असलेली माहिती खूप मर्यादित असते. अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. अशा वेळी मी एकटाच त्या ठिकाणी काही काळ थांबतो. तेव्हा वास्तुदेखील बोलते फक्त आपल्याला ती भाषा कळावी लागते. त्या मूक संवादातून अनेक कोडी उलगडतात, काही वेगळया कल्पना सूचतात. हा खूप विलक्षण अनुभव मी घेतला आहे. बाकी अनुभवांविषयी सांगायचं तर टाटा ग्रुपबद्दल सांगायला मला आवडेल. २६ नोव्हे २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याने ताज पॅलेस हॉटेलच्या इमारतीचे बरेच नुकसान झाले होते. ती इमारत कमीत कमी वेळात पूर्वस्थितीत आणण्याची जबाबदारी आमच्या कंपनीने स्वीकारली. आमच्यासाठी हे खूप अभिमानास्पद आणि तितकेच जबाबदारीचे काम होते. हल्ल्याच्या दरम्यान इमारतीवरील घुमटाकार भागाची आगीमुळे दुर्दशा झाली होती. या घुमटाचा काही भाग इमारतीच्या आतमध्ये होता आणि त्याखाली पुन्हा फॉल्स सिलिंगची रचना होती. थोडक्यात सांगायचे तर घुमटाचा हा भाग दर्शनी नव्हता. मूळ घुमटामध्ये बर्मा टिक या उत्तम लाकडाचा वापर करण्यात आला होता. या न दिसणाऱ्या भागासाठी घाना टिक ह्या किंमतीने स्वस्त असलेल्या लाकडाचा वापर करावा का असं आम्ही विचारलं. यावर टाटा ग्रुपकडून आम्हाला सांगण्यात आलं की "रतन टाटांनी जाहीर केले आहे की आम्ही ताज पॅलेसचे आधीचे गौरवशाली रूप परत आणू. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत तुम्ही कुठलीही तडजोड करू नका. मूळ इमारतीत ज्या दर्जाचा माल वापरला होता त्याच प्रतीचा उत्तम माल तुम्ही वापरा.'इतका चोख आणि काटेकोर व्यावसायिक दृष्टिकोन आज खरंच दूर्मिळ झाला आहे.

४. टेक्निकल ऑडिटच्या निमित्ताने तुम्ही कुठल्याही व्यवस्थापनाची कार्यपद्धती गुणवत्तापूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्य करता. पण याविरुद्ध आजकाल सर्वत्र दिसणारी 'चलता है' किंवा 'जुगाडी' मनोवृत्ती याविषयी आपलं काय मत आहे?

जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करताना ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डच्या नियमांचा आधार घेतला जातो. गेल्या पावसाळ्यात सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्यामुळे सगळ्याच पुलांच्या मजबुतीविषयी शंका घेतली गेली. बांधकाम केवळ जुने आहे म्हणून ते धोकादायक आहे असे म्हणता येत नाही आणि नवीन आहे म्हणून ते भक्कम आहे असे होत नाही. बांधकामाची गुणवत्ता मोजण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्या केल्या जातात आणि त्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञांची मदत घेतली जाते. ज्याप्रमाणे प्रत्येक डॉक्टर हा शल्यविशारद नसतो त्याप्रमाणे प्रत्येक स्ट्रक्चरल इंजिनिअर हा ऑडिटर असू शकत नाही. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे "चलता है' ही मनोवृत्ती आजकाल सर्रास दिसते. कायद्याची भीतीही कमी झाली आहे. फळ नेहमी देठापासून कीडतं त्याच न्यायाने प्रमुख पदावरील व्यक्ती कशी आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. बांधकामाच्या दर्जाबद्दल कोणीच खात्री देत नाही. साधा टोस्टर जरी विकत आणला तरी त्याच्याबरोबर ६ महिन्यांची गॅरंटी मिळते पण लाखो-करोडो रुपये मोजून विकत घेतलेल्या जागेच्या मजबुतीबद्दल कुणालाच शाश्वती नसते ही वस्तुस्थिती आहे. मात्र आता लागू करण्यात आलेल्या ’रेरा’ कायद्यामुळे बांधकामक्षेत्रातील गैरप्रकारांना काही प्रमाणात चाप बसण्याची शक्यता आहे.

५. मुंबईतील कुठल्या वास्तूंचा जीर्णोर्धार करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते?

जुन्या वास्तुंच्या संवर्धानाद्वारे इतिहासाचे किंवा संस्कृतीचे जतन करणे आवश्यकच आहे. पण अन्न वस्त्र, निवारा या जनतेच्या मूळ गरजा भागवल्यानंतर त्यांचा क्रमांक येतो हे लक्षात ठेवायला हवे. पूर्वीच्या काळातील इमारती पाहताना 'क्रिएशन' दिसतं, पण आता मात्र केवळ 'कंस्ट्रक्शन' होताना दिसतं. तरी देखील सगळ्याच जुन्या वास्तू टिकवण्याचा अट्टाहास करण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते. याबाबतीत व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावे लागतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या, पुढील पिढ्यांच्या दृष्टिने महत्त्वाचा वारसा ठरणाऱ्या, सौंदर्यपूर्ण वास्तुंचे जतन हे झालेच पाहिजे. ते करण्याची जबाबदारी घेणाऱ्याने त्या वास्तूच्या प्रेमात पडायला हवे, तिच्याशी कुठल्याही प्रकारे प्रतारणा न करता काम केले तर ते उत्तमच होणार यात शंका नाही.

६. आपल्या व्यवसायातील आगामी योजनांविषयी काय सांगाल?

माझ्या वडिलांपासून आमचे सर्व कुटुंबच या व्यवसायात आहे. माझा भाऊ, मुलगा हे स्ट्रक्चरल इंजिनिअर आहेत, मुलगी आर्किटेक्ट आहे. आम्ही ह्या कामाकडे लक्ष्मीची नव्हे तर सरस्वतीची पूजा ह्या भावनेने बघतो. सध्या हाजीअली दर्ग्याच्या पुनरुज्जीवनाचे काम चालू आहे. सध्या मोदी सरकारचे राज्य असल्याने आमच्या व्यवसायात अधिक वाढ होण्याची चिन्हे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मी गुरुस्थानी मानतो. त्यामुळे राजगड किंवा रायगडाचे काम करायला निश्चितच आवडेल.

Chetan Raikar,

A professional Structural Engineer, did B.E. Civil from Sardar Patel University and Master of Science in Conservation of Heritage structure from Heriot - Watt University, Edinburgh, UK.

Awards & Recognition –

• Young member award for professional achievement in 1999 by ACI
• Excellence vocational award by Rotary International District in 2009
• Recipient of Maharashtra cha Kohinoor award on 16th March 2013

He has published innumerable research papers in national and international journals . He has two patents in innovation in machine development to his credit.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division