फोर्ड मोटर ते इन्फोसिस व्हाया टाटा ग्रूप

- उदय तारदाळकर

ford infosys tata"कधी कधी, आपण कुणाचे तरी नावडते असतो" हे ऐतिहासिक वाक्य दुसरे हेनरी फोर्ड ह्यांनी फोर्ड मोटरचे तत्कालीन अध्यक्ष आणि आपल्या ३२ वर्षाच्या काळात मुस्टंगसारखी किफायती मोटर यशस्वीपणे बाजारात आणणाऱ्या ली आयकोका ह्यांचा पायउतार करताना १९७८ साली वापरले होते. इन्फोसिस प्रकरणात परिस्थिती जरी वेगळी असली तरी विशाल सिक्का ह्यांच्या राजीनाम्यानंतर ह्या प्रसंगाची आठवण झाली. सायरस मिस्त्रींचे टाटा समूहातून निर्गमन हे अशाच प्रकारचे होते. टाटा समूह, इन्फोसिस आणि फोर्ड मोटर ह्या कंपन्यांच्या प्रमुखांची तुलना रंजक आहे.

इन्फोसिसची लढाई ही मुख्यतः तात्विक कारणांवर म्हणजेच पारदर्शकता आणि नियमांचे पालन ह्या इन्फोसिसच्या मूळ गाभ्यावर लढली गेली. टाटा समूहाच्या बाबतीत टाटा सन्सने आपल्यापेक्षा वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या मिस्त्रींना नाट्यमयरित्या बाहेरचा रस्ता दाखविला. तुलनाच करायची झाली तर आयकोका ह्यांनी फोर्डला दिलेले योगदान आणि विशाल सिक्का ह्यांनी आपल्या छोटेखानी काळात केलेले प्रयत्न ह्यातली तफावत बरीच मोठी आहे.

Lee Iacocca carआयकोका हे कसलेले व्यावसायिक, परंतु आपल्या मालकाबरॊबर म्हणजे दुसऱ्या हेनरी फोर्ड ह्यांच्या विरुद्ध त्यांनी मोर्चेबांधणी केली. दोन विभिन्न व्यक्तिमत्वे कंपनीवर नियंत्रण ठेवण्यास उत्सुक होती, परंतु अनुभवाच्या विरूद्ध ली आयकॉकाना कधीच संधी नव्हती. एकंदर इतिहास पाहता फोर्ड मोटर कंपनीतून आयकॉकाची गच्छन्ति अपरिहार्य होती. असे म्हणतात की आयकॉका-फोर्ड संघर्ष हा गोल्फ गाडी आणि एक बलाढ्य मैक ट्रक यांच्यातील स्पर्धेचा होता आणि निकाल अपेक्षेनुसार लागला.

मालक आणि व्यावसायिक व्यवस्थापन ह्यांची सांगड घालणे ही नेहमीच तारेवरची कसरत ठरली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनात प्रचंड वाढ झाली आणि मालक आणि व्यावसायिक व्यवस्थापन वेगळे अशी संकल्पना रूढ झाली. वाढत्या कारभारामुळे व्यावसायिक व्यवस्थापन अनिवार्य झाले. भारताचा विचार करता, आजपर्यंतचा अनुभव असा की कितीही व्यावसायिकतेचा साज चढविला तरी मालक हा कायम मालकच राहिला. भारतात त्याला शेठ अशी उपाधी दिली गेली. पिढ्या न पिढ्या ह्या शेठ लोकांनी व्यावसायिक व्यवस्थापकाला हातचे राखून अधिकार दिले.

ratan tata with cyrus mistry 75ac1bb6 a71d 11e6 8311 ecdc6071292fउद्योगात व्यावसायिकतेचा उल्लेख केल्यास टाटा समूहाचे नाव प्रथम डोळ्यापुढे येते. आठ तास काम, मोफत वैद्यकीय मदत, कल्याण विभागाची स्थापना, कर्मचारी भविष्य निधी, बोनस आणि ग्रॅच्युइटी अशा अनेक योजना कायद्याद्वारे अधिनियमित केले जाण्याआधी टाटा समूहाने अमलात आणल्या होत्या. टाटा समूहात व्यासायिकतेच्या दृष्टीने तत्कालीन अध्यक्ष जे आर डी टाटांनी रुसी मोदी, नानी पालखीवाला, सुमंत मुळगावकर प्रभृतींची एक नवी फळी निर्माण केली, परंतु रतन टाटांच्या काळात ह्या संकल्पनेला खीळ बसली. रतन टाटांचा वारसदार शोधण्याची मोहीम सुरू झाली. त्यानंतर अध्यक्षाची माळ प्रथमच टाटा हे आडनाव नसलेल्या सायरस मिस्त्री ह्या व्यक्तीच्या गळ्यात पडली. टाटा समूहाच्या रूढी आणि परंपरा सोडून मिस्त्री जात आहेत असा अनुभव आल्याने त्यांना जाणे भाग पडले. सद्य स्थितीत टाटा कन्सल्टन्सी आणि इतर टाटा कंपन्यांच्या कामगिरीत मोठी तफावत आहे. चंद्रशेखर ह्यांनी टाटा कन्सल्टन्सीसाठी दिलेल्या योगदानाची परिणती म्हणजे त्यांच्याकडे चालून आलेले टाटा समूहाचे मानाचे अध्यक्षपद.

विशाल सिक्का ह्यांच्या राजीनाम्यानंतर नंदन निलेंकेणी हे आपल्या पूर्व कर्तृत्वामुळे आणि त्यांनी केलेल्या योगदानामुळे इन्फोसिसचे नवे अध्यक्ष झाले. नैतिकता आणि नीतिमत्ता ह्या गोष्टी जरी टाटा समूहासाठी अध्याहृत असल्या तरी नारायण मूर्ती आणि इन्फोसिसच्या संचालकांनी आपण त्यात कुठेही कमी नाही हे वारंवार सिद्ध केले. जेव्हा जेव्हा शंकेची पाल चुकचुकली तेव्हा जास्तीत जास्त गोष्टी भागधारकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून त्यांनी पारदर्शीपणाचा एक मानक उभा केला. इन्फोसिसने नेहमीच सविस्तर वार्षिक अहवाल प्रकाशित केले. त्याशिवाय इन्फोसिस ही पहिली कंपनी होती ज्यात तिमाही परिणाम, लेखापरीक्षित परिणाम, अंतरिम ताळेबंद, अर्धवार्षिक निकाल प्रकाशित होत होते. जेव्हा २००२ मध्ये अमेरिकेत सारबेन्स ऑक्स्ले कोड लावण्यात आला तेव्हा सूचीबद्ध कंपन्यांना आपले दस्तऐवजीकरण करण्यासाठी सरासरी १.७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतका खर्च झाला. त्याशिवाय सरकारने त्यासाठी वेळेचे बंधनसुद्धा घातले होते. तेव्हा इन्फोसिस ही एकमेव कंपनी होती, काहीही अतिरिक्त खर्च न करता त्यांनी असे कळविले की आम्ही दाखल केलेलं दस्तऐवज सारबेन्स ऑक्स्लेच्या नियमाचे पूर्णपणे पालन करतात. अर्थातच इन्फोसिससाठी तो एक अभिमानाचा क्षण होता.

60127234सिक्का ह्यांच्या कारकिर्दीत पारंपारिक व्यवसायाचे नूतनीकरण करण्याबरोबरच नव्या तंत्रज्ञानाला अनुसरून नवीन व्यवसाय विकसित करणे ह्यासाठी प्रयत्न झाले. २०१६ साली विशाल सिक्का ह्यांनी कंपनीसाठीची २०२० पर्यंतची उद्दिष्टे जाहीर केली ती सर्वार्थाने महत्वाकांक्षी होती. ती उद्दिष्टे अविचारी वाटल्यानंतर बदलण्यात आणली. परंतु इन्फोसिसच्या संचालक मंडळाने ह्याबाबत सिक्का ह्यांची री ओढली. व्यावसायिक व्यस्थापनाचा हा एक फसलेला प्रत्यत्न ठरला. कोणत्याही कंपनीत मालकाचे असणारे आपलेपण हे नेहमीच लाभदायक असते. इन्फोसिसचे संचालक अशी जबाबदारी घेण्यास कमी पडले हे निश्चित. मूर्तींनी उपस्थित केलेल्या, पनायातील इन्फोसिसच्या व्यवस्थापकांच्या गुंतवणुकीबद्दलचा प्रश्न आणि त्याबद्दल मुख्य वित्त अधिकारी बन्सल ह्यांच्याकडे असलेली माहिती ह्याबाबत सर्व संचालकांनी संदिग्धता बाळगली. बन्सल आणि मुख्य अनुपालन अधिकारी केनेडी ह्यांना नोकरीतून मुक्त करताना देण्यात आलेले घबाड असे अनुत्तरित प्रश्न इन्फोसिसच्या प्रतिमेला काळिमा फासणारे होते. अशा प्रसंगानंतर जे झाले ते अटळ होते. सिक्का ह्यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरद्वारे त्यांना आलेल्या संदेशात, त्यांच्या बहुतांश सहकाऱ्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त करताना त्यांनी तीन वर्षात केलेल्या सुधारणा आणि बदलांचे स्वागत केले. मूर्ती आणि निलेंकेणी ह्यांना प्रतिष्ठेचा प्रश्न न करता त्याबाबतीत आत्मचिंतन करूनच निर्णय घ्यावे लागतील.

इन्फोसिसच्या काही धोरणांचा विचार करता, वयाच्या ५२ व्या वर्षी निलेंकेणी ह्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जबाबदारी का सोडली हे समजणे अनाकलनीय आहे. ऐन भरात असलेल्या आपल्या नेत्यास निवृत्त करणे हे नक्कीच चुकीचे धोरण होते. सर्वच प्रवर्तक हे यशस्वी कार्यकारी अधिकारी होतील हे कशाच्या आधारे गृहीत धरले गेले? मुळात असा निर्णय काही अंशी इन्फोसिसच्या आजच्या परिस्थितीस कारणीभूत आहे. निलेंकेणींसारख्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला ५२ व्या वर्षी निवृत्त करण्यामागचा तर्क कळणे मुश्किल आहे. ह्या ठिकाणी आधुनिक वाल्मिकी गदिमांच्या 'देवा दया तुझी' ह्या गाण्याची आठवण होते. फरक इतकाच की इन्फोसिसने निलेंकेणी असलेले पितृछत्र काढून नेणत्या नाहीतर जाणत्या कंपनीच्या मांडवात असलेला वसंत आपल्या दारातून जाऊ दिला. अशा तर्हेने एका अर्थी इन्फोसिसच्या वैभवाला दृष्ट लागली. इन्फोसिसमध्ये आता प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ हे दोन्ही नव्या नेतृत्वाकडे जाईल. तोपर्यंत, मनुष्यबळ हे ज्याचे सर्वस्व असते ती सेवा पुरविणारी महाकाय कंपनी काही काळासाठी नक्कीच दिशाहीन असेल. निलेंकेनीच्या आगमनानंतर शेअर बाजार आणि इतर सर्व घटकांनी त्यांचे जरी स्वागत केले असले तरी इन्फोसिसला आपल्या भाळावर बसलेल्या ह्या कुठाराचा घाव भरण्यास बराच अवधी लागेल हे निश्चित.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division