टाटा सन्स आता ‘प्रायव्हेट’ होणार

tataसुमारे १०५ अब्ज डॉलरच्या कार ते सॉफ्टवेअर अशा विविध उद्योगांनी युक्त अशा टाटा समूहातील कंपन्यांची प्रवर्तक कंपनी असलेल्या टाटा सन्सचा 'प्रायव्हेट होण्याच्या ठरावाला भागधारकांनी मान्यता दिली आहे. यामुळे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोठाच धक्का बसला आहे.

टाटा सन्स प्रायव्हेट झाल्यावर मिस्त्री कुटुंबाला त्यांचा १८.४ टक्के हिस्सा समूहाबाहेरील व्यक्तीला किंवा कंपनीला विकता येणार नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होण्याला मंजुरी मिळवण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मांडले गेले. या ठरावांना भागधारकांनी मान्यता दिल्याचे टाटा सन्सकडून सांगण्यात आले. यामुळे टाटा सन्स लिमिटेडचे रूपांतर टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होण्यामुळे मिळणाऱ्या सवलती –

टाटा सन्सबरोबर केला जाणारा व्यवहार, तिच्या उपकंपन्यांबरोबर केले जाणारे व्यवहार, सहयोगी तसेच घटक कंपन्यांसोबतचे व्यवहार यांना केवळ संचालक मंडळाचीच मंजुरी लागणार. यामध्ये पुढील व्यवहारांचा समावेश होईल -

- समूहातील कंपन्यांची मत्ता (अॅसेट्स) विकणे, भाड्याने देणे किंवा काढून टाकणे.
- विलिनीकरण तसेच एकत्रिकरणातून मिळालेली नुकसान भरपाई ट्रस्टच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे.
- पेडअप कॅपिटल व राखीव निधीपेक्षा अधिक रक्कम कर्जाऊ घेणे.
- व्यवस्थापकीय संचालक, संचालक तसेच व्यवस्थापनातील पदे भरणे व त्यांचे मानधन ठरवणे.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाचा टाटा सन्समध्ये १८.४ टक्के हिस्सा आहे. टाटा ट्रस्टचा ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड झाल्यास मिस्त्रीकुटुंबीय अल्प भागधारकांमध्ये समाविष्ट होणार आहे. त्यामुळे टाटा समूहाचा हा निर्णय छोट्या भागधारकांवर अन्याय करणारा असल्याचा दावा सायरस मिस्त्री यांनी केला आहे. टाटा सन्समध्ये भागधारक असलेल्या टाटा समूहातील कंपन्यांनी टाटा सन्सच्या प्रायव्हेट होण्याला विरोध करावा, असे आवाहन मिस्त्री यांनी केले आहे.

टाटा सन्सने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होतानाही पब्लिक लिमिटेडचे काही अधिकार मिळावेत अशी मागणी केली आहे. टाटा सन्सने आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये बदल करून ते कंपनी कायदा, २०१३शी सुसंगत करण्याची मागणी भागधारकांकडे केली आहे. तसेच स्वतंत्र संचालकाची व्याख्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये घालणे व विविध कंपन्यांबरोबर करण्यात येणाऱ्या व्यवहारांबाबत मार्गदर्शक तत्त्वांचा अंतर्भाव करणे यासाठी टाटा सन्स प्रयत्नशील आहे. या दोन्ही गोष्टी पब्लिक लिमिटेड कंपनीअंतर्गत येतात.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division