व्हर्टिकल फार्मिंग परिषद

abcव्हर्टिकल फार्मिंग- शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या समन्वयातून जगाच्या वाढत्या लोकसंख्येची भूक भागवू शकणारा पर्यावरणस्नेही उपक्रम

नेदरलँडसचा दूतावास,व्हीएचएल युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या परिषदेत तज्ज्ञांचे एकमत

मुंबईतील नेदरलँडसच्या दूतावासातर्फे 'हॉलंड मीटस मुंबई' या उपक्रमाअंतर्गत 'डच डिझाईन अँड द सिटी ' या थीमवर अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

मानवी जीवन अधिकाधिक सुविधापूर्ण करत असताना निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करून त्याचा शहरी जीवनशैलीत अंतर्भाव करण्यासाठी, डिझाइनवर आधारित उत्तम उपाय शोधून काढणे हा उपक्रमामागचा उद्देश आहे. नेदरलँडसच्या दूतावासातर्फे आयोजित या उपक्रमात डच डिझाईन, कला, स्वस्त गृहनिर्माण, जल शुद्धीकरण आणि कचऱ्यातून ऊर्जानिर्मिती अशा वैविध्यपूर्ण चर्चासत्रांचा समावेश होणार आहे.या उपक्रमाचे उदघाटनपर पहिले पुष्प आधुनिक शहरी जीवनासाठी गरजेच्या ' व्हर्टिकल फार्मिंग 'या संकल्पनेवरील परिसंवादाच्या रूपाने गुंफण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात नेदरलँडसच्या दूतावासाबरोबर शिक्षण प्रसारक मंडळींची प्रिं. एल.एन.वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (WeSchool) आणि नेदरलँड्सची व्हीएचएल युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस (VHL) सामील झाल्या होत्या. शि.प्र.मंडळीच्या वेलिंगकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च(WeSchool) ने अलीकडेच व्हीएचएल युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस (VHL) तसेच बारामतीस्थित ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या (ADT) सहकार्याने त्रिपक्षीय इरादापत्राद्वारा कृषी,कृषीव्यवसाय,आणि व्यापारविषयक संयुक्त शैक्षणिक उपक्रमांची घोषणा केली आहे.
आज देश स्मार्ट सिटीच्या स्वरूपात शहरांचा विकास करू पाहत असताना वाढत्या लोकसंख्येला सामावून घेणारे गृह आणि पायाभूत सेवासुविधांचे प्रकल्प राबवले जाणार हे उघड आहे पण त्याचबरोबर केवळ हरित ऊर्जेचा नव्हे तर समग्र पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा आग्रह धरणे गरजेचे आहे,या दृष्ट्या 'व्हर्टिकल फार्मिंग' चे महत्व आहे असा विचार या परिषदेत तज्ज्ञांनी मांडला. या परिषदेला नेदरलँड्सच्या मुंबईतील दूतावासातील कौन्सुल जनरल गिडो टिलमन,कृषी सल्लागार वोटर वरही,कृषीव्यवसाय आणि व्यापारविषयक अधिकारी श्रीतनु चॅटर्जी, व्हीएचएल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष पीटर व्हॉन डोंगन, हॉलंड डोअर को ऑपरेटीव्हचे प्रमुख कार्यकारी अधिकारी निक बॉटडन, रिक -झ्वोन इंडिया सीड्स लि.चे विक्री साखळी अधिकारी एच पी दोडामणी,सवीर बायोटेकचे संचालक संजय सुदान आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे समूह संचालक प्रो डॉ उदय साळुंखे हे मान्यवर उपस्थित होते.
आपल्या उदघाटनपर भाषणात नेदरलँड्सचे मुंबईतील कौन्सुल जनरल गिडो टिलमन यांनी म्हटले,” 'हॉलंड मीट्स मुंबई‘ या उपक्रमाची ही दुसरी आवृत्ती आहे, यातून नेदरलँड्समधील विविध क्षेत्रांना महाराष्टाशी जोडून महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचे ध्येय आहे. नेदरलँडसमधले डिझाईनवर आधारित उपाय आणि साधने, ज्यासाठी नेदरलँड जागतिक पातळीवर नावाजले गेले आहे, ती या उपक्रमाद्वारे मुंबईसारख्या महानगरासाठी स्थानिक पातळीवर अतिशयउपयुक्त ठरतील असा माझा विश्वास आहे नेदरलँडस व महाराष्ट्र यांच्यामधल्या अशा प्रकारच्या आदानप्रदानातून विविध क्षेत्रात संवाद आणि सहकार्याच्या संधी उपलब्ध होतील,त्यातून एकमेकांपासून शिकत प्रगती साधता येईल “
या परिषदेच्या सत्रात उपस्थितांचे स्वागत करताना वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे समूह संचालक डॉ उदय साळुंखे म्हणाले," जागतिक हवामानात होणाऱ्या बदलांचे जे दुष्परिणाम शेतीवर होत आहेत त्यातून अन्नसुरक्षेचा मुद्दा आज सर्व जगाच्या चिंतेचे कारण बनला आहे.हे चित्र बदलण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येत हरित दृष्टिकोनच नव्हे तर हरितजीवन शैली आणि संस्कृतीचा स्वीकार आणि पुरस्कार करणे गरजेचे झाले आहे. आपण एकमेकांच्या बलस्थानाचा फायदा घेत कार्यरत होऊया आणि या आदानप्रदानातून भविष्यकालीन पिढ्यांचे उज्वल भवितव्य घडवूया."
नेदरलँड्सच्या व्हीएचएल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष पीटर व्हॉन डोंगन यांनी शैक्षणिक संस्थांच्या सहयोगातून संयुक्त प्रकल्पाद्वारा तरुणाईला व्हर्टिकल फार्मिंग प्रकल्पात सामील करून घेत त्यांना अधिक ज्ञान आणि कौशल्ये देऊन,या क्षेत्रात उत्तम करियर मिळवून देत, तरुण पिढीचे भवितव्य घडवता येईल अशी आशा व्यक्त केली
फलोत्पादन, कृषी पशुपालन आणि निर्यात/ विक्री अशा क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या हॉलंड डोअर कोऑपरेटीव्हचे प्रमुख कार्यकारी अधिकारी निक बॉटडन यांनी ' विस्तारणाऱ्या भारतीय शहरांची भूक भागवण्यासाठी व्हर्टिकल फार्मिंग एक साधन की साध्य' या विषयावर एका विस्तृत सादरीकरण प्रस्तुत केले . मुंबई आणि अन्य महानगरांसाठी डिझाईन केलेल्या व्हर्टिकल फार्मिंग या पद्धतीचे वैशिष्ठय म्हणजे ही कुठेही उभारली जाऊ शकते,ती फक्त विशिष्ट हंगामात नाही तर वर्षभर वापरली जाऊ शकते, इथे पाणी आणि इतर संसाधने कमी प्रमाणात वापरली जातात, तसेच यातल्या वनस्पती अधिक वेगाने वाढतात म्हणून पारंपरिक शेती किंवा ग्रीनहाउसपेक्षा ही पद्धती अधिक उत्पादन देते त्याचा एक उपयोजित वस्तुपाठच त्यांनी सादर केला.
रिक झ्वोन इंडिया सीड्स लि.चे विक्री साखळी अधिकारी एच पी दोडामणी यांनी जगभरातील लोकसंख्येच्या अन्नपुरवठ्याच्या पूर्तीसाठी मोठी मागणी असणाऱ्या भाज्यांचे उत्पादन कसे वाढवता येईल ते स्पष्ट केले.त्यांचे 'प्लांट फॅक्टरी'वरील सादरीकरण भविष्यकालीन शेतीची दिशा स्पष्ट करणारे होते. 'प्लांट फॅक्टरी' ही प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड सांद्रता यांचे कृत्रिम नियंत्रण असलेली एक बंदिस्त यंत्रणा आहे ज्यामुळे शेतकरी /कृषीशास्त्रज्ञ वर्षभर भाज्याचे उत्पादन करू शकतात. सवीर बायोटेकचे संचालक संजय सुदान यांनी ग्रीनहाऊस तंत्रज्ञानावर भर देत, मातीच्या वापराविना करू शकणाऱ्या हायड्रोपॉनिक्स शेतीतंत्राची माहिती देताना यातून लेट्यूस,टोमॅटो,काकडी अशी पिके कशी घेता येतील त्याचे सादरीकरण केले. व्हर्टिकल फार्मिंग यंत्रणा सध्या जरी महागडी वाटत असली तरी मार्केटची व्याप्ती वाढवून आणि पुरवठा साखळीतले दोष दूर करून येणाऱ्या काळात या रूपाने एक अत्त्यंत उत्तम पर्याय भारतीय शेतकरी आणि उद्योजकांना उपलब्ध होईल असा विचार सर्व तज्ज्ञांनी एकमताने व्यक्त केला.
शहरी जीवन जगणाऱ्या माणसावर रोजच्या जगण्याच्या ताणतणावांचा वाढता दबाव आहे तर दुसरीकडे जैवविविधतेविषयीची आस्था आणि विषारी कीटकनाशकांविषयीच्या चिंता आहेत. या सर्व घटकांनी शहरी तसेच ग्रामीण नागरिकांना जागरूक होण्यासाठी उद्युक्त केले आहे आणि बरेच जण स्वतःचे अन्न स्वतःच्या लहानशा जागेत मग ती सोसायटीतली, शाळेतली रिकामी जागा असो, अंगण, बाल्कनी,पेन्टहाऊस व टेरेसवरची जागा असो, ताज्या फळभाज्या, पालेभाज्या,सॅलड्स,फळे,हर्ब्स आणि फुले 'पिकवण्याला' प्रेरित होऊ लागले आहेत. आरोग्य आणि फिटनेस राखण्यासाठी स्वतः पिकवलेले अन्न खाण्याकडे कल वाढत चालला आहे म्हणून या विचारसरणीच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी या परिषदेत मागदर्शन करण्यात आले. शाश्वत जीवनपद्धतीचा अवलंब आणि विकास करण्याची जवाबदारी नागरिक म्हणून प्रत्येकावर आहे हा विचार पुन्हा अधोरेखित करत त्या दृष्टीने कोणते प्रयत्न करावेत या बाबतीत ही परिषद म्हणजे या दिशेने उचललेले महत्वाचे पाउल ठरेल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division