"मर्जरनंतर व्यवसायाबरोबरच दृष्टिकोनही विस्तारला.' श्रीराम दांडेकर

SSDभारतातील स्टेशनरी बाजारपेठेत कॅम्लिनचे नाव नेहमीच अग्रक्रमाने घेतले जाते. आपल्यापैकी प्रत्येकाला अक्षरओळख होण्याच्या आधीच रंगीत खडू, पेन्सिल्स, कलरिंग बुक्स यामुळे ओळखीचा झालेला ब्रॅंड म्हणजे ’कॅम्लिन’. गेल्या तीन पिढ्यांपासून घरोघरी पोहोचलेली कॅम्लिनची दर्जेदार उत्पादने २०११ पासून ’कोकुयो कॅम्लिन’ या नव्य़ा रुपात बाजारपेठेत येऊ लागली आहेत. जपानमधील कोकुयो ह्या सुप्रसिद्ध कंपनीबरोबर जॉइंट व्हेन्चर करून कॅम्लिनने जागतिक पातळीवर आपला व्यवसाय नेला आहे. या एकत्रिकरणाचे प्रमुख सूत्रधार श्रीराम दांडेकर यांच्याशी ’महाराष्ट्राचे उद्योगविश्व’च्या वाचकांसाठी चित्रा वाघ यांनी केलेली ही बातचित.
 

२०११ पासून कोकुयो या जपानी कंपनीबरोबर भागीदार म्हणून तुम्ही व्यवसायाचा विस्तार करत आहात. परदेशी कंपनीबरोबर कोलॅबोरेशन करावे असा निर्णय घेण्यामागची नक्की कारणे काय होती? ही प्रक्रीया एकंदरीत कशी होती?
१९३१ साली स्थापन झालेल्या कॅमलिन कंपनीची १९८८ मध्ये पब्लिक लिमिटेड कं. झाली. त्यानंतर काही वर्षांनी भारतात खुल्या अर्थव्यवस्थेचे आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. इथली बाजारपेठ मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मोकळी झाल्यामुळे साहजिकच इतर स्थानिक कंपन्यांप्रमाणे आम्हालाही जागतिक स्पर्धेला सामोरे जावे लागले. त्यात सर्वात मोठी स्पर्धा होती चीनी उत्पादनांकडून. या मालाचा दर्जा फारसा चांगला नसला तरी त्याच्या किंमती कमी आणि वैविध्य जास्त होतं. स्टेशनरी उद्योगात सतत नवीन प्रॉडक्टसमध्ये गुंतवणूक करावी लागते. ब्रॅंड मार्केटिंग करावं लागतं. मात्र प्रत्यक्ष मार्जिन कमी असतं. अनेक स्थानिक कंपन्यादेखील परदेशातील तंत्रज्ञानावर भर देत नवनवीन उत्पादने बाजारपेठेत आणत होत्या. जे आम्हीदेखील करत होतोच. या स्पर्धेत टिकून राहायचं विशेषत: उत्पादननिर्मितीमध्ये टिकून राहायचं तर मोठ्या भांडवली गुंतवणूकीबरोबरच खेळत्या भांडवलाची गरजही मोठी असते. परदेशातील बलाढ्य स्टेशनरी कंपन्यांची गुंतवणूक क्षमता खूप जास्त आहे. त्यापैकी काहींना ४०० वर्षांपेक्षा मोठा इतिहासही आहे.  
या पार्श्वभूमीवर कॅमलिनच्या संचालक मंडळाने विचार केला, चर्चा केली. व्यवसायवाढीसाठी प्रायव्हेट इक्विटीच्या माध्यमातून किंवा कर्जातून भांडवल उभारणी करण्यापेक्षा याच व्यवसायात असलेल्या एखाद्या मान्यताप्राप्त, दीर्घ व्यावसायिक अनुभव असलेल्या परदेशी कंपनीशी हातमिळवणी करावी असा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने भारतीय व्यवस्थापनावर विश्वास असेल अशा कंपनीचा शोध घेताना ’कोकुयो’ या जपानी कंपनीचे नाव पुढे आले. कोकुयोची कार्यसंस्कृती आणि व्यवस्थापन मूल्यं कॅम्लिनशी मिळतीजुळती होती. जपानी भाषेत ’कोकू’ म्हणजे स्वदेश आणि ’यो’म्हणजे अभिमान किंवा आनंद.
कुरोदा नावाच्या कुटुंबियांची ही मूळ कंपनी सुमारे ११० वर्षांपूर्वी स्थापन झाली. त्या काळी दोन कुरोदा बंधु आपले नशीब आजमावण्यासाठी ओसाका शहरात आले. तिथे त्यांनी हाताने खळ लावून फाइल्स बनवण्याची कंपनी घरातच स्थापन केली. अनेक वर्षे स्ट्रगल केल्यावर हळूहळू व्यवसाय वधारला. आता कोकुयो ही जपानमधली स्टेशनरी उद्योगातली सर्वात मोठी कंपनी आहे. योगायोगाची गोष्ट अशी की माझे आजोबा नानासाहेब आणि त्यांचा भाऊ काकासाहेब दांडेकर हे याच प्रकारे कोकणातून मुंबईला येऊन गिरगावात शाई बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यातूनच पुढे कॅम्लिनचा विस्तार झाला.
आम्ही एकत्र येण्याआधी कोकुयोच्या काही अधिकाऱ्यांशी त्यांच्या काही उत्पादनांबाबत मार्केट सर्व्हेच्या निमित्ताने माझा संपर्क आला होता. मात्र त्यावेळी एकत्रितपणे काम करण्याचा कुठलाच विचार मनात नव्हता. संचालक मंडळाच्या निर्णयानंतर आम्ही त्यांच्याशी बोलणी सुरू केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अवघ्या साडेतीन महिन्यात वाटाघाटी पूर्ण झाल्या. Venture Capital Circle या सुप्रसिद्ध न्युजलेटरनेदेखील Fastest Joint Venture म्हणून या घटनेची नोंद केली.   
कोकुयोबरोबर भागीदारी करण्याचे ठरवल्यावर संपूर्ण दांडेकर कुटुंबियांनी या व्यवहाराचे सर्वाधिकार मला दिले. याबद्दल मी त्या सर्वांचा मन:पूर्वक आभारी आहे. मी या कामासाठी मर्चंट बॅंकर न नेमण्याचा काहीसा धाडसी निर्णय घेतला आणि त्याला सर्वांनी सहकार्य दिले. माझ्या मते दोन कंपन्यांमध्ये बोलणी करण्यासाठी मर्चंट बॅंकर नेमला तर दोघात एक प्रकारचं अंतर, पडदा निर्माण होतो. जपानी माणसं ही कागदावरच्या आकड्यांपेक्षा, चमकदार प्रेझेंटेशन किंवा स्मार्टनेसपेक्षा विश्वासाला, प्रामाणिकपणाला सर्वात जास्त महत्त्व देतात हा माझा अनुभव होता. मर्चंट बॅंकर नेमल्यास देवाणघेवाणीची बोलणी कदाचित अधिक फायदेशीर होत असतील. पण मी तो धोका पत्करला आणि त्याचा चांगला परिणाम झालेला दिसून आला. अर्थात या संपूर्ण प्रक्रीयेत Merger & Acquisition या विषयातील तज्ञ, जे.सागर असोसिएट्सचे अॅड.नितीन पोतदार हे कायदा सल्लागार म्हणून माझ्याबरोबर होते.
ही एकत्रिकरणाची प्रक्रीया पूर्ण झाल्यावर आमच्यातील काही दांडेकर कुटुंबिय आपापले भागभांडवल विकून बाहेर पडले. त्यानंतर काहींनी आपापल्या स्वतंत्र व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले. आशिष दांडेकर यांनी ’कॅम्लिन फाइन केमिकल्स’चा विस्तार करत इटलीमधील ’बोरीगार्ड’ ही कंपनी विकत घेतली. आज या कंपनीचा टर्नओव्हर 560 कोटीहून अधिक आहे आणि सुमारे 40 देशांमध्ये तिचे जाळे पसरलेले आहे.
माझे काका दिलिप दांडेकर हे कोकुयो कॅम्लिन प्रा.लि. चे अध्यक्ष आहेत तर मी स्वत: उपाध्यक्ष आहे. जपानी आणि भारतियांची विचारसरणी अनेक बाबतीत जुळते असा अनुभव आम्ही घेतला. माझे मोठे काका श्री.सुभाष दांडेकर यांनी १० वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली. कॅम्लिनने त्यांना मानद अध्यक्षपद देऊ केलं होतं. कंपनी मर्जरनंतर त्यांचं हे पद राखलं जावं अशी आमची मागणी कोकुयोच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने मान्य केली. मोठ्यांना आदर देण्याची आपली परंपरा त्यांच्यातही रुजल्याचा हा एक सुखद अनुभव होता.

कोकुयोबरोबर एकत्रितपणे व्यवसाय सुरू केल्यानंतरचा आपला अनुभव कसा होता?
IMGP5451जपानमधील Brand rankingमध्ये कोकुयो कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून जवळपास प्रत्येक जपानी माणसाने ह्या ब्रॅंडची उत्पादने वापरली आहेत. जसं स्टेशनरी म्हटलं की रतन टाटा, अदि गोदरेज यांच्यापासून सामान्य नागरिकांपर्यंत आपल्याकडे कॅम्लिन हा ब्रॅंड प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. दोन्ही कंपन्या चांगल्या दर्जासाठी ओळखल्या जातात. वह्यानिर्मितीच्या क्षेत्रात कोकुयो हा लिडिंग ब्रॅंड आहे. मर्जरनंतर कोकुयोची उत्पादनं इथेही आणण्यात येत आहेत व त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आमच्या कंपनीची तारापूर, तळोजा, वसई, जम्मू, मिरज, गोवा अशा अनेक ठिकाणी उत्पादन केंदं आहेत. आता आम्ही पाताळगंगेला १४ एकर जमिनीवर मोठा प्रकल्प उभारत आहोत. कॅम्लिनसाठी सर्वात मोठा आणि कोकुयोसाठी दुसऱ्या नंबरचा असा हा प्रकल्प आहे. पुढच्या दहा-वीस वर्षांमधला विस्तार आणि गरजा लक्षात घेऊन सुमारे २५०,००० स्क्वे.फुट जागेवर कारखाना व इतर बांधकाम चालू आहे. पाताळगंगेची जमीन आम्ही घेतली तेव्हा गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते आणि जास्तीत जास्त उद्योग तिथे उभारले जावेत यासाठी तेथे वातावरणनिर्मिती केली जात होती. त्यामुळे कोकुयोमधील जपानी अधिकाऱ्यांनाही नवीन कारखान्यासाठी आम्ही गुजरातमध्येच जागा घ्यावी असे वाटत होते. पण आमचा पिंड मराठी असल्याने स्वाभाविकच मी आणि दिलीप दांडेकर यांनी महाराष्ट्राची बाजू लावून धरली. थोड्याफार अडचणी आल्या तरी हरकत नाही पण इतका मोठा प्रकल्प आपल्या मराठी मातीतच व्हावा हा आमचा जोरदार आग्रह त्यांना मान्य करावा लागला.
जेव्हा असा एखादा मोठा उद्योग उभा राहतो तेव्हा तिथे काम करणाऱ्यांबरोबरच चहावाल्यांपासून ते लहानमोठी कंत्राटं घेणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच उत्पन्नाचं साधन उपलब्ध होतं. काही कामं ही बाहेरूनही करून घेण्यासारखी असतात.या संबंधी पंचक्रोशीतल्या गावांमध्ये माहिती पोहोचावी म्हणून मेळावे घेणं, पत्रकं वाटणं असं सगळं सुरू झालं आहे. पॅकेजिंगच्या कामासाठी आता आम्ही प्रशिक्षणदेखील सुरू करतोय. त्याला विशेषकरून महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. विविध बचतगट, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत यांच्यामार्फत रोजगारनिर्मितीच्या कामाला गती मिळत आहे.     

आपल्या अनुभवातून, परदेशी कंपन्यांबरोबर एकत्रितपणे काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल?

42636a 600x600Joint Venture केल्याने मुख्य म्हणजे व्यवसायाचा विस्तार होतो त्याचप्रमाणे आपला दृष्टिकोनही विस्तारतो. व्यवसाय आपल्या देशापुरताच मर्यादित राहात नाही. जागतिक पातळीवर आपण कुठे आहोत याची स्पष्ट जाणीव होते. मात्र   कुठल्याही व्यवहाराचे फायदे तोटे हे प्रत्येकाने तोलून पाहावे लागतात. त्यामुळे या बाबतीत काही ठोस उत्तर देणं अवघड आहे. त्याचप्रमाणे जेव्हा दोन कंपन्या एकत्र येतात तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्याचं आकुंचन हे निश्चितच होतं. त्याला सामोरे जाण्याची तयारी आहे का हे पाहायला हवं. कंपनीच्या व्यवहाराची प्रमुख सूत्रं कुणाकडे ठेवायची हे ज्याने त्याने ठरवायला हवं. फायदे तोटे प्रत्येकाला तोलून पाहावे लागतील. आपल्या अपेक्षेइतका फायदा काही बाबतीत कदाचित होणार नाही किंवा वाटला होता त्यापेक्षा तोटाही कमी होण्याची शक्यता असते. शिवाय इतका मोठा निर्णय घेण्याआधी तुमची पुढची पिढी याच व्यवसायात यायला उत्सुक आहे का याचाही अंदाज प्रत्येकाने घ्यायला हवा.

परदेशी व्यवसाय धोरणांमध्ये कुठल्या तरतूदी आवश्यक आहेत असे आपल्याला वाटते? विशेषत: अनिवासी भारतीय उद्योजकांना आपण काय सांगाल?
552नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून थेट परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही कोलॅबोरेशन केलं त्याहीपेक्षा FIPB म्हणजेच Foreign Investment Promotion Board च्या माध्यमातून परवानग्या मिळवणं आता खूपच सुलभ झालं आहे. भारतीय उद्योजकांबद्दल परदेशातही विश्वासाचं वातावरण आहे. जपानमधल्या भेटींमध्ये मला असं जाणवलं की तिथले लघुउद्योजक आपल्याकडच्या लघु आणि मध्यम उद्योजकांबरोबर एकत्र व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत. भाषेची अडचण आता कमी होत आहे, तिथली नवीन पिढी इंग्लिश शिकत आहे आणि दुभाषीदेखील सहज उपलब्ध आहेत. मात्र या उद्योजकांना एकमेकांची माहिती मिळावी, संपर्क साधणे सुलभ व्हाचे यासाठी पूल बांधणं गरजेचं आहे.
अनिवासी भारतीय उद्योजकांबद्दल बोलायचं तर परदेशात जाऊन व्यवसाय उभारण्याचं कौशल्य आणि अनुभव त्यांच्यापाशी आहेच. भारतीय बाजारपेठेचीही माहिती त्यांना असणारच. तरी इतकं आपण त्यांना नक्कीच सांगू शकतो की इथल्या उद्योगांमध्ये जरूर गुंतवणूक करा. इथली दारं तुमच्यासाठी उघडी आहेत. आणि जर मराठी असाल तर ’मेक इन इंडिया’पेक्षा ’मेक इन महाराष्ट्र’ असा दृष्टिकोन ठेवा.

धन्यवाद! भविष्यातील आपल्या सर्व योजनांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division