सोशल नेटवर्कवरून मिनिटाला १६ कोटींची उलाढाल

social networkingजगभरात वेगाने प्रसार होत असलेल्या ई-कॉमर्स क्षेत्रात प्रत्येक मिनिटाला तब्बल सोळा कोटी रुपयांची उलाढाल होते, अशी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.

यामध्ये फेसबुकवरून ४,५०४ डॉलर, पीन्टरेस्ट या संकेतस्थळावरून ५,४८३ डॉलर, तर ट्विटरवरून ४,३०८ डॉलर इतक्या प्रमाणात या सोशल नेटवर्किंग साइट्सवरून ई-कॉमर्स कंपन्यांना उत्पन्न मिळते, असे दि असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम)- डिलोइट संस्थांनी सादर केलेल्या संयुक्त अहवालात समोर आले आहे.

आर्थिक व्यवहार पारदर्शक, सुरक्षित व वेगवान करण्यासाठी सध्या अनेक कंपन्या ‘कॅश ऑन डिलीव्हरी‘ मॉडेलपेक्षा ‘पेमेंट गेटवे‘चा वापर करण्यावर भर देत आहेत. गेल्या काही वर्षात ई-कॉमर्स उद्योगाची जगभरात मोठ्या प्रमाणावर भरभराट झाली आहे. या क्षेत्राच्या प्रगतीमध्ये सोशल नेटवर्किंग माध्यमांचे योगदान मोठ्या प्रमाणावर आहे. सोशल माध्यमांना आलेली परिपक्वता व त्याचा वाढता वापर यामुळे उत्पादनांची ऑनलाईन विक्री करण्यासाठी हा अतिशय उपयुक्त मंच असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

सोशल माध्यमांद्वारे ग्राहकांना बाजारात येऊ घातलेली नवी उत्पादने, त्याचे परीक्षण, रेटिंग्स, शिफारसी तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध उत्पादनांची माहिती मिळते. तसेच ग्राहकांना लगेचच उत्पादनाविषयी प्रतिक्रिया देणे सोपे झाले आहे. त्यामुळे कंपन्यांना वेळोवेळी आपल्या उत्पादनांमध्ये महत्त्वाचे बदल करणे शक्य होते. आपल्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करणार्‍या कंपन्यांना सोशल माध्यमांद्वारे उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण करण्याची संधी उपलब्ध होते. या सर्व गोष्टींचा ग्राहकांना उत्पादन खरेदीविषयी योग्य निर्णय घेण्यास फायदा होतो. त्यामुळे कंपन्यांच्या कायमस्वरूपी ग्राहक संख्येत वाढ होण्यास मदत होत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division