व्होल्टासतर्फे नवीन एअर कूलर उत्पादन

वातानुकूलित यंत्र निर्मितीत वर्चस्व असलेल्या टाटा समूहातील व्होल्टास लिमिटेडने एअर कूलर उपकरण उत्पादनात शिरकाव केला आहे. याद्वारे कंपनीने या श्रेणीत एक लाख उपकरण विक्रीचे लक्ष्यही जाहीर केले आहे. वर्षभरात कंपनीचा ५,००० रुपयांतील एअर कूलरही बाजारात धडकेल.

एअर कूलर बाजारपेठेत आघाडीतील तीन नाममुद्रांमध्ये स्थान मिळविण्याचा मनोदय या निमित्ताने व्यक्त करताना कंपनीचे अध्यक्ष प्रदीप बक्षी यांनी पंखे आणि वातानुकूलित यंत्र यांच्यातील तफावत या श्रेणीद्वारे कमी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

एअर कूलरमार्फत १० टक्के महसूल अपेक्षित असणाऱ्या व्होल्टासने वर्षभरात एक लाख नव्या उत्पादनाच्या तर चालू वर्षांत १० लाख वातानुकूलित यंत्रे विक्रीचे लक्ष्य राखले आहे. कंपनीच्या एअर कूलरची किंमत ८,००० ते १५,००० रुपये आहे. कंपनी येत्या वर्षांत १० उपकरणांसह ५,००० रुपये मूल्याचे नवे उपकरणही सादर करेल, असेही या वेळी सांगण्यात आले.

व्होल्टासकडे विविध ७८ प्रकारांतील वातानुकूलित यंत्रे आहेत. कंपनीच्या एकूण वातानुकूलित यंत्रांपैकी १५ टक्के विक्री ही उद्योग, आस्थापना यांना लागणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून होते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division