’आदित्य बिर्ला’चे वस्त्र व्यवसाय एकत्र

325680 aditya birla logo editedआदित्य बिर्ला समूहाने विविध कंपन्यांखालील ब्रँडेड फॅशन कपडय़ांच्या व्यवसायांचे उपकंपनी पँटलुन्स फॅशन रिटेल लि. अंतर्गत एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून 'आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (एबीएफआरएल)' या एकत्रित रूपातील नव्या कंपनीची निर्मिती होणार आहे. ब्रँडेड कपडय़ांच्या क्षेत्रातील ही ५,२९० कोटी रुपयांच्या घरात उलाढाल व देशातील सर्वात मोठे विक्री जाळे असणारी कंपनी ठरेल.

आदित्य बिर्ला नुव्हो, पँटलुन्स फॅशन अँड रिटेल आणि मदुरा गारमेन्ट्स लाइफस्टाइल रिटेल कं. लि. (एमजीएलआरसीएल) कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकांमधून एकत्रीकरणाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

या निर्णयाप्रमाणे आदित्य बिर्ला नुव्होचा 'मदुरा फॅशन' हा व्यवसाय विभाग आणि एमजीएलआरसीएल या कंपनीचा उंची कपडय़ांचा 'मदुरा लाइफस्टाइल' हा व्यवसाय पँटलुन्स फॅशन्स व रिटेल लि. या कंपनीत सामावला जाणार असून, तिचे नावही बदलून 'आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (एबीएफआरएल)' असे होईल.

या व्यवसाय एकत्रीकरणाने त्या त्या कंपन्यांच्या भागधारकांना नव्या एकत्रित कंपनीचे स्वतंत्र मूल्यांकन कर्त्यां कंपनीने ठरविलेल्या प्रमाणात समभागांचे वितरण केले जाईल. आदित्य बिर्ला नुव्होच्या भागधारकांना त्यांच्या हाती असलेल्या कंपनीच्या प्रत्येक पाच समभागांच्या बदल्यात पँटलुन्स रिटेलचे २६ समभाग अतिरिक्त मिळतील. मदुरा गारमेन्ट्सच्या भागधारकांना त्यांच्याकडील कंपनीच्या प्रत्येक ५०० समभागांच्या बदल्यात एकत्रित पँटलुन्स रिटेलचे सात समभाग अतिरिक्त मिळतील. पँटलुन्स रिटेलची देशभरात १०४ स्टोअर्स आणि ३० फॅक्टरी आऊटलेट्स आहेत.

लुई फिलिप्स, व्हॅन ह्य़ूजेन, अ‍ॅलन सोली, पीटर इंग्लंड आणि पिपल पुरुषांच्या तयार कपडय़ाच्या सर्वाधिक खपाच्या ब्रॅण्ड्सची मालकी असलेल्या मदुरा फॅशन्सच्या विशेष विक्री दालनांची संख्या १,७३५ आहे. या सर्व विक्री दालनांचे व्यवस्थापन नव्या एकत्रित कंपनीच्या पंखाखाली येणार असून, एकूण १,८६९ विक्री दालनांचे प्रचंड जाळे असणारी ही भारतातील पहिलीच कंपनी असेल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division