तुर्कस्तानची औरंगाबादला गुंतवणुकीबाबत पसंती

पायाभूत सुविधांचे जाळे व तांत्रिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने औरंगाबादेत जास्तीत जास्त गुंतवणूक यावी आणि उद्योग उभारले जावेत असा प्रयत्न उद्योग विभागातर्फे सुरू आहे. अलिकडेच मंत्रालयात तुर्कस्तानच्या राजदूतांबरोबर झालेल्या बैठकीत तुर्कस्तान सरकारने औरंगाबादेत जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सुचवले.
राज्यात गुंतवणूक न केलेले अनेक देश आता पुढे येत आहेत. तुर्कस्तानची इच्छा त्या देशाचे राजदूत सब्री एरगन यांनी बोलून दाखवली, असे सांगून देसाई म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, पर्यटन व हाउसिंगच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तुर्कस्तान तयार आहे. मुंबईसह मोठ्या शहरांत जागांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे उद्योगवाढीसाठी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांचा विकास करण्याची आमची योजना आहे. या दृष्टीने औरंगाबाद योग्य ठरते. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार होत असल्याने तेथे उद्योगांसाठी चांगली संधी असल्याचे आम्ही एरिगन यांना सांगितले. औरंगाबादेत जागांचे भाव कमी आहेत. त्यामुळे तुर्कस्तानच्या राजदूतांनीही या प्रस्तावावर विचार करू असे म्हटल्याचे उद्योगमंत्री म्हणाले.
तुर्कस्तानात टेक्स्टाइल उद्योग मोठा आहे. अमरावती आणि नागपुरात आपण टेक्स्टाइल पार्क उभारत आहोत. यासाठी तुर्कस्तान गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी तुर्कस्तानला येऊन त्यांच्या पंतप्रधानांची भेट घेण्याचे आमंत्रणही एरिगन यांनी या वेळी दिले.

(वरील सदरातील माहिती विविध प्रेस रिलिज, तसेच उद्योगसंस्था आणि अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे.)

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division