महाराष्ट्र चेंबरतर्फे महिला उद्योजकता परिषदेचे आयोजन

महिला उद्योजिकांनी अधिक सक्षम, कणखर बनून आपल्या क्षेत्रात अग्रेसर रहावे , जागतिक स्पर्धेत टिकून रहावे यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या महिला विभागातर्फे नियमितपणे विविध कार्यक्रमांचे व चर्चासत्रांचे आयोजित केले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. १६ मे रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे महिला उद्योजकता परिषदेचे आयोजन करण्यात आले.

या परिषदेच्या उद्धाटनसत्रासाठी ग्रामीण विकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम्, चेंबरचे उपाध्यक्ष अमित कामत, चेंबरच्या महिला उद्योजिका समितीच्या अध्यक्षा डॉ धनश्री हरदास, परिषदेच्या समन्वयक प्रा.अमृता आमडेकर आणि नीता अरोरा, प्रसिद्ध फॅशन डिझायनर रितु कूमार व शायना एन सी, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या रुपा नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला उद्योजिका या राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून या परिषदेमुळे त्यांना योग्य प्रेरणा मिळून यशाची नवी कवाडे खुले होतील अशी आशा चेंबरचे उपाध्यक्ष अमित कामत यांनी व्यक्त केली.

डॉ धनश्री हरदास यांनी आपल्या प्रास्ताविकात समाजातील महिलांची जीवनशैली आणि मानसिकतेमधील बदल, आधुनिक स्त्रियांच्या विस्तारित क्षमता आणि उद्योजकता तसेच सर्जनशीलतेकडे तिचा वाढता कल याबाबत भाष्य केले. ही परिषद म्हणजे महिला उद्योजकांना जागतिक बाजारपेठेकडे वळवून त्यांच्या कर्तुत्वाचे क्षितीज विस्तारीत करणारे, त्यांना नावलौकीक मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन देणारे व्यासपीठ असल्याचे सांगीतले.

जुन्या काळात महिला ही दुसर्‍यांच्या मर्जीनुसार, परिस्थितीमुळे किंवा आर्थिक गरजेमुळेच उद्योजकतेकडे वळत होती, परंतू आज जग बदलत आहे. आजची सुसंस्कृत स्त्री ही आपल्या आवडीसाठी आणि सर्जनशीलतेच्या सक्रीय रहाण्याच्या आनंदासाठी उद्योजकतेकडे वळत आहे. उद्योजकतेकडे वळण्यासाठी स्त्रीनेच स्त्रीला प्रेरीत केले पाहीजे मग ती आई, बहिण, सासू, नणंद, जाऊ, मैत्रिण कोणीही असो असे मत मा. पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. मुलतः स्त्री ही चतुरस्त्र असली आणि एका वेळेस अनेक आघाडया सांभाळायचे तंज्ञ जरी तिला अवगत असले तरी सर्व एका टप्प्यावर सर्व जबाबदार्‍यांचे ओझे स्वतःवर लादून घेणे चुकीचे आहे. याउलट काही जबाबदार्‍या वाटून द्याव्यात यासाठी स्त्री-पुरुष हा भेद विसरुन पुढच्या पिढीलाही सर्व कामांची सवय लावण्याची आवश्यकता आहे असेही त्या म्हणाल्या.

मुंबईच्या प्रख्यात फॅशनडिझायनर, नगर-सेविका शायना एन.सी. यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महिलांच्या सामाजिक प्रतिमेचा आणि तिच्याकडून असलेल्या अपेक्षांबद्दल भाष्य करून महिला अनेक आव्हानांना तोंड देत असतानाही आपले वेगळेपण सादर करण्यात ती कायम यशस्वी होते अशा शब्दात महिलांचा गौरव केला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी आयोगासमोर लैंगिक छळ किंवा फसवणूक यापेक्षाही खूप जास्त पटीने विवाहीत स्त्रीवरील कौटूंबिक अत्याचाराचे प्रमाण आजही जास्त असल्याच्या भीषण वास्तवाची माहिती दिली. प्रसिद्धी करुन आपली प्रतिमा (इमेज) तयार करण्यापेक्षा कार्य करुन आपले व्यक्तिमत्व सादर करा असा सल्ला त्यांनी महिला उद्योजिकांना दिला.

मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित निलीमा मिश्रा या भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थेच्या माध्यमातून ग्रामविकासाची अनेक कामे निष्ठेने करत आहेत. बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली तसेच तळागाळातून उद्योजिका घडविण्याचे अविरत कार्य त्या करत आहेत. त्यांच्याप्रमाणेच सामजिक कार्याला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्या म्हणजे सुजाता साहू. १७०००फीट फौंडेशनच्या माध्यमातून लडाखच्या अतिदुर्गम भागातील खेड्यापाड्यांमध्ये किशोरवयीन मुलांसाठी चांगल्या शैक्षणिक सोयी सुविधा पुरविण्याचे कार्य करत आहेत. उद्योजकता व सामाजिक कार्यातील भरीव योगदानाबाबत या दोघींना मा. पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ब्रॅंडिंग या विषयावरील तांत्रिक सत्रात अॅड गुरू भरत दाभोळकर सहभागी झाले होते. ब्रँड हा उत्पादक किंवा जाहीरातदार तयार करत नसून तो ग्राहक तयार करतो, त्यामुळे आपले उत्पादन विकतांना तसेच त्याची जाहीरात करताना आपला ग्राहक वर्ग नीट ओळखून त्याप्रमाणे सादरीकरण करावे असा सल्ला त्यांनी दिला आणि त्या अनुषंगाने जाहीरातक्षत्रातील आपले अनुभव सांगितले. कॅरन शैवा यांनी प्रत्येकाची मार्केटींग करण्याची आपली शैली असते, परंतू सर्वात शेवटी ती ग्राहकाला रुचणारी, त्यांच्या अपेक्षांना पुरणारी आणि समाधान देणारी असावी असे प्रतिपादन केले. ब्रिंदा मिलर यांनी कालाघोडा महोत्सव या भव्य उपक्रमाच्या आयोजनाच्या कारकिर्दीतील अनुभव कथन केले. आज कालाघोडा महोत्सवाने अनेक कलाकारांना, उद्योजकांना व्यासपीठ दिले व हा महोत्सव एक ब्रँण्ड झाला आहे परंतु यासाठी अनेकांना परिश्रम घ्यावे लागले आहेत. ज्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तीन महिने आपली कामे सोडून या उपक्रमात फक्त समाधानासाठी सहभागी होतात असे प्रतिपादन केले. आसामी कलाकार सुनिता भुयान यांनी आपल्या व्हॉयलिन वादनाच्या कलेद्वारे स्त्रीशक्तिचे वेगळे रुप दाखवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सत्राचे अध्यक्ष युरेका फोर्ब्जचे एस के पालेकर यांनी मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा आढावा घेतला.

यापुढील यशस्वी उद्योजिकांच्या मुलाखत सत्रात परिषदेच्या समन्वयक प्रा. अमृता आमडेकर यांनी कमानी टयूब्जच्या कल्पना सरोज, १७०००फीट फांऊंडेशच्या संस्थापिका सुजाता साहू, सहज फाऊंडेशनच्या संस्थापिका जबिनाबेन जम्बुघोडावाला, ग्राईण्ड मास्टर लि.च्या संचालिका मोहिनी केळकर यांच्या कार्याबद्दल, त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल प्रश्न विचारले. आपल्या उत्तरातून विचार आणि अनुभव शेअर करुन मान्यवरांनी उपस्थितांना प्रेरित केले.

नियोजन व वित्त या तांत्रिक सत्रात एन.एस.आय.सी.च्या योजनांबद्दल एस सुरेश यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. महिला उद्योजकांना देण्यात येणारी सबसिडी, तसेच www.msmeshopping.com या वेब पोर्टलवरून उत्पादनविक्रीसाठी विनामूल्य सोय, बॅंकांमध्ये प्रपोजल सादर करण्यासाठी करण्यात येणारी मदत अशा सेवा महिलांसाठी निश्चितच प्रोत्साहन देणाऱ्या होत्या.

योग्य मनुष्यबळ उभे करणे, जपणे, वेळोवेळी त्यांना कौशल्य व प्रशिक्षण देऊन सक्षम करणे हीच उद्योजकाच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत BNI, हैदराबादचे भरत शहा यांनी व्यक्त केले. नॅचरल्स ब्युटि-चेनचे सी के कुमारवेल यांनीही उपस्थितांना खुसखुशीत शैलीत बहुमोल मार्गदर्शन केले. सत्राच्या चेअररपर्सन WECच्या जया गोयल यांनी सत्रातील चर्चेचा गोषवारा सादर केला.

पुढील पॅनेल डिस्कशनमध्ये बिझनेस अॅट पिनस्टॉर्मच्या जागतिक प्रमुख अन्सु गुप्ता, अभिनेत्री तारा शर्मा, सुनिला पाटील, रुपा नाईक या यशस्वी उद्योजिका तसेच डॉ धनश्री हरदास सहभागी झाल्या. चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांना या चर्चेत आमंत्रित करुन स्त्री व पुरुषांची उद्योजकतेमधील बरोबरी या विषयावरील त्यांचे मत विचारण्यात आले. आजची स्त्री ही सर्व आघाडया समर्थपणे सांभाळत असून आता कोणत्याही क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी उरली नाही असे प्रतिपादन मंडलेचा यांनी केले. सुप्रसिध्द अभिनेत्री तारा शर्मा यांनी आपल्या वडिलांकडून सातत्याने क्रियाशील रहाण्याची प्रेरणा घेतली आणि बॉलिवूड तारका न होता दूरदर्शन कार्यक्रम निर्माती म्हणून काम करण्यात जास्त आनंद मिळविला असे सांगितले. यशाच्या संकल्पना प्रत्येकासाठी वेगळया असतात, अपयश किंवा यशाच्या कुठल्याही टप्प्यावर स्थीर न रहाता सतत पुढे जावे, यशस्वी उद्योजक तोच ज्याला आपल्या कामाचे समाधान मिळते असे मतही त्यांनी व्यक्त केले. असे त्यांनी सांगितले.

या परिषदेच्या आयोजनात परिषद समितीच्या सदस्या, ईशरत सैयद, सीमा शहा,गीता करमसी आणि नेहा खरे यांचे सहकार्य लाभले.

या परिषदेत सुमारे ४०० महिलांनी सहभाग घेतला. मान्यवरांमध्ये चेंबरच्या माजी अध्यक्षा मीनल मोहाडीकर, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, कार्यकारीणी सदस्य अतुल कुलकर्णी, उमेश वानखेडे, सुनिता फाल्गुने, नेहा खरे, आशा मामेडी, प्रमोद शहा, करुणाकर शेट्टी, उर्वशी धराधर, सुनिल झोडे, सुनिल गोडसे, अनुजा देशपांडे, अश्विनी देशपांडे, सुवर्णा अय्यर, मल्लिका गायधनी, ॠजुता मुळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division