स्टार्ट अप
                                                             – श्रेयस शेटे

shreyasअडिच वर्षांपूर्वी श्रेयस श्रीकांत शेटे या तरुणाने श्वार्मा ह्या हटके खाद्यप्रकाराची पार्लेकरांना ओळख करून दिली. चविष्ट, पोटभरीचा आणि खाण्यास सुटसुटित असाया लेबनिज लोकप्रिय प्रकारात निरनिराळ्या चवीच्या सॉसेसमध्ये चिकन आणि भाज्या घोळवून भाकरीसदृश खुसखुशीत पावात (पिटा ब्रेड) ते घालून त्याची गुंडाळी सर्व्ह केली जाते. सर्व प्रकारच्या गिऱ्हाईकांचा विचार करून इथे शाकाहारी श्वार्मा तसेच वेगवेगळी नाविन्यपूर्ण सॅलेड्स तयार केली जातात.
साठ्येमधून बी.कॉम केल्यावर श्रेयसने काही काळ नोकरीदेखील केली पण साचेबद्ध कामाचा कंटाळा आल्याने त्याने स्वत:चा काहितरी व्यवसाय करावा असे ठरवले. काही काळ शेअरबाजारात स्टॉक ट्रेडिंगदेखील केले. त्यात थोडाफार पैसा हाताशी आला. पार्ल्यातील हनुमान रोडवरील नारायण निवासच्या खाली अगदी छोटी जागा उपलब्ध असल्याचे ओळखीतून कळले. केटरींगमधील एका परिचिताने या जागेत कुठलेच खाद्यपदार्थ बनवता येणार नाहीत, केवळ श्वार्मा मशीन मावू शकेल असा सल्ला दिला. स्वत:चे 50,000 घालून त्याने मशीन विकत घेऊन व्यवसाय सुरू केला.21 वर्षांच्या श्रेयसला पाहून काम करण्यासाठी सुरुवातीला कोणी पुढे येईना. शेवटी मित्र आणि कुटुंबियांना मदतीला घेऊन त्याने स्वत:च श्वार्मा तयार करायचे ठरवले.
लहानपणापासून पार्ल्यात वाढलेल्या आणि भरपूर मित्रमैत्रीणींमध्ये वावरणाऱ्या श्रेयसला पहिल्या दिवसापासूनच गिऱ्हाइकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल तो म्हणतो, ”मी पूर्ण शाकाहारी आणि श्वार्मा म्हटलं की चिकन हवंच. आयुष्यात कधी न खाल्लेला पदार्थ शिजला की नाही हेदेखील कळायचं नाही. पण कंटाळा झटकून निरनिराळे प्रयोग करत गेलो. रेसिपी इंटरनेटवरून मिळायला अवघड नव्हतं. अनुभवातून सगळं शिकत गेलो. पहिल्या दिवशी फार तर 15-20 श्वार्मा खपतील असं वाटत होतं पण तब्बल 150 ची मागणी आली. तीन महिने स्वत:च सगळी कामं केली. आर्थिक व्यवहार आजही आई बघते. पूर्णपणे जम बसायला एक वर्षं जावं लागलं. आज पार्ल्याबाहेरुन खास इथे श्वार्मा खाण्यासाठी लोक येतात. भुत जलोकिया ह्या आसामी झणझणीत मिरचीचा सॉस घालून बनवलेला श्वार्मा प्रचंड लोकप्रिय झाला आहे. इथे बसून खाण्यासाठी 8-10 लोकांची सोय होते पण अनेकजण गाडीत बसून, रस्त्यावर उभं राहतं किंवा फिरत फिरत खाणं पसंत करतात. पहिले तीन महिने आम्ही स्वत:च किचन सांभाळलं. घरोघरी पार्सल्स नेऊन दिली. ठिकठिकाणी ब्रोशर्स वाटली. मार्केटिंगवर विशेष मेहनत घेतली. ऑनलाईन ऑर्डर्सचं प्रमाणही खूप आहे. जोगेश्वरीपासून वांद्र्यापर्यंत आम्ही डिलिव्हरी देतो. पार्टी ऑर्डर्स, कॉर्पोरेट ऑर्डर्ससुद्धा येत असतात.’
पार्ल्यात रुजलेल्या या टिकलीएवढ्या हॉटेलला वर्ष-दीड वर्षातच टक्कर द्यावी लागली ती खेटून उभ्या राहिलेल्या महाकाय मॅकडॉनल्डशी. पण चवीतलं वैविध्य, उत्तम प्रतीच्या कच्च्या मालाचा वापर आणि परवडणाऱ्या किमती यामुळे“हॅपी ग्रिल मोअर’च्या व्यवसायावर परिणाम झाला नाही. उलट लोकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे श्रेयसने कोलडोंगरी येथे एक सेंट्रल किचन सुरु केलं आहे आणि गोरेगावला एक फ्रेंचायझीसुद्धा चालू झाली. याशिवाय दत्त मंदिराच्या बाजुला “मोमोज’ची गाडीसुद्धा नव्याने सुरू केली आहे.“आज माझ्याकडे एकून 13 जणांचा स्टाफ आहे. एकही मराठी माणूस अशा कामासाठी उत्सुक नाही. ही सगळी मुलं बिहार, झारखंड, नेपाळ इथली आहेत. मीच त्यांना सगळं शिकवून तयार केलं. त्यांची प्रचंड मेहनत करण्याची आणि शिकण्याची तयारी आहे. त्यांना व्यवस्थित पगार देणं, मैत्रीपूर्ण वागणूक देणं यामुळे गावाला गेली तरी ती परत माझ्याकडे कामाला येतात हा माझा अनुभव आहे. थोड्याच काळात मिडल इस्टर्न पद्धतीचं संपूर्ण जेवण करण्याचा माझा विचार आहे. त्यासाठी नवीन उद्योजकांना मिळणारे मुद्रा लोन घ्यायचाही विचार आहे.’ असं सांगणारा श्रेयससध्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एल.एल.बी च्या परीक्षेची तयारी करतोय. कुठल्याही उद्योजकाने लाखो रुपये भरून एम.बी.ए करण्यापेक्षा कायद्याचं शिक्षण घेण्याविषयी तो आग्रही आहे.
- चित्रा वाघ
9821116936

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division