प्रकाश प्रल्हाद भालेराव  साखळी उद्योगजगातील परीसहस्त

praksh bhaleraoप्रकाश प्रल्हाद भालेराव हे व्हेंचर कॅपिटल (औद्योगिक उपक्रमांतील भांडवल) ह्या क्षेत्रातील दिगज्ज मानलं जाणारं एक नामांकित व्यक्तिमत्व. अग्रगण्य भांडवलदार असलेले प्रकाश भालेराव जरी अमेरीकेतून कार्यरत असले तरी त्यांच्या कार्याचा आवाका जगभर पसरलेला आहे. त्यांच्या अनेक यशस्वी प्रकल्पांतर्गत सुरुवातीला ग्राहकांना देऊ केलेल्या शेअरमधून मोठी धनराशी एकत्रित केली गेली. कालांतराने या कंपन्या जगभरातील दिग्गज अशा उद्योजकांनी खरेदी केल्या आणि गुंतवणूक करणाऱ्यांना प्रचंड नफा देऊन गेल्या.
व्हेंचर कॅपिटलच्या उद्योगजगतात प्रकाश भालेराव एंजल इन्वेस्टर (सुरुवातीचा भांडवलदार) व सिरीयल एन्टरप्रेनर (साखळी उद्योजक) या भूमिकेत दिसतात. त्यांच्या ह्या गुंतवणुकीमुळे बऱ्याच कंपन्यांच्या संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती झाली आहे. जी कंपनी नुकतीच जन्माला आली आहे, नवीन आहे अशा कंपन्यांचे सीईओ बनून भालेराव कामास सुरुवात करतात. बाहेरून आणलेल्या सीईओचा पगार कंपनीला परवडू लागेल इतकी आर्थिक प्रगती झाली की ते हळूच कंपनीतून बाहेर पडतात. या त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून एक गोष्ट लक्षात येते की एखाद्या कंपनीचा चेअरमन बनून राहणे हे त्यांचे कायमस्वरूपी काम नाही. इतक्या वर्षात बऱ्याच कंपन्यांसाठी त्यांनी हे महत्वाचे पद भूषवले आहे. एंजल इन्वेस्टर आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट ही भूमिका पार पाडत असताना भालेराव सिलिकॉन व्हॅलीतील 40 पेक्षा अधिक स्टार्ट अप मध्ये सहसंस्थापक होते. डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन (DEC) आणि C-CUBE Microsystems या कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाच्या कळीच्या मुद्द्यांवर यशस्वी कार्य केल्यावर त्यांनी उपरोक्त कंपन्यांची स्थापना केली. पैशाचा विनियोग व्यवस्थितपणे आणि गंभीररीत्या केला तर त्यात समाजाचे स्वरूप पालटण्याची जबरदस्त ताकद असते म्हणून त्यांनी व्हेंचर कॅपिटलिस्ट बनण्याचा निर्धार केला.भालेराव स्वतः माहिती तंत्रज्ञान विषयातले तज्ञ आहेत. आय.टी व्यवसायात रोज दत्त म्हणून समोर उभ्या ठाकणाऱ्या अवघड प्रश्नांना आपल्या उपजत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सोडवणाऱ्या भारतीय व्यावसायिकांच्या समस्या त्यांना खुप लवकर कळल्या होत्या. त्यांच्या मते बुद्धीचे बळ असलं तरी व्यापारी कुटुंबांची पाश्वभूमी नसल्यामुळे आयटी व्यवसायिकांना उद्योगधंद्यातील खाचाखोचा कळत नाहीत. म्हणूनच त्यांनी मांडलेल्या कल्पनांमध्ये असलेल्या व्यावसायिक संभावना पूर्णपणे समजून घेऊन त्यांचं लाभकारक व्यवहार्य उपक्रमात रूपांतर करणाऱ्या एखाद्या व्यक्तीची त्यांना गरज असते. प्रकाश भालेराव हे त्या प्रतिमेत चपखल बसतात.
भालेराव हे दहापेक्षा अधिक उपक्रम निधी (VENTURE FUND) मध्ये सहभागी असून त्यात मर्यादित भागीदार आहेत. त्यातील काही फंडांनी आपलं लक्ष भारतात मिळणार्यात संधींवर केंद्रित केले आहे. भारतात अधिष्ठित पहिलंवहिलं बहुभाषिक पोर्टल webduniya, Inc. कार्यरत होण्यात भालेराव यांची मोठी भूमिका आहे.
संगणकावर काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव नसतानासुद्धा संगणकीय प्रोग्रामिंग मधील भालेराव यांच्या प्राविण्याचे श्रेय जातं प्रा.अय्यर व प्रा.नियोगी यांनी शिकवलेल्या 'जुगाड' म्हणजेच आयत्यावेळेस उपलब्ध असलेल्या साधनांनिशी कामगिरी फत्ते करण्याच्या ह्या कौशल्याला.
इंदोर येथील SGSITS मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याच विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांनी मॅसेच्युसेट येथील वरसेस्टर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. 1977 मध्ये भालेराव कंपनीत DEC कंपनीत CPU डिझायनर या पदावर रुजू झाले. त्यांच्या टीम मध्ये तेव्हा 50 जण होते. 1990 मध्ये जेव्हा भालेराव यांनी ही कंपनी सोडली तेव्हा ते GMच्या हुद्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांच्या हाताखाली दोन हजार कर्मचारी काम करत होते. ह्या तेरा वर्षात त्यांनी प्रचंड अनुभव गाठीस बांधला. DEC मधल्या यशस्वी कारकि‍र्दीनंतर त्यांनी C-CUBE microsystems ह्या कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष, इंजीनियरिंग ह्या पदावर काम केलं. ह्या कंपनीचे सहसंस्थापकही होते. या छोट्या कंपनीने डिजिटल तंत्रज्ञानात मोठी कामगिरी केली. त्यांच्या मनातलं उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्णत्वास पोहोचलं. आणि त्याच बरोबर त्यांच उद्योजक कौशल्यही सिद्ध झालं.C-CUBE ने संपादन केलेल प्रचंड यश अचंबित करणारं होतं. त्या कंपनीत द्वितीय क्रमांकावरील महत्त्वाची व्यक्ती असा भालेरावांचा दबदबा होता. इंजिनिअरिंग मार्केटिंग विभागप्रमुख या पदावर ते कार्यरत होते. सिरीयल एन्टरप्रेनर हा इतरउद्योजकांपेक्षा थोडा वेगळा. संकल्पना त्याची, कंपनी उभी करण्याचे कष्ट त्याचे असले तरी कंपनीला चांगला आकार आला की तिची जबाबदारी समर्थ व्यक्तीवर सोपवून पुन्हा नवीन कंपनीच्या उभारणीत मश्गुल होणारा हा साखळी उद्योजक. गुंतवणूक करूनही गुंतून न पडणारा गुंतवणूकदार.
व्हेंचर कॅपिटलिस्ट व्यवसायात एन्जल भांडवलदारांचे विविध प्रकार आहेत. निष्क्रिय गुंतवणूकदार फक्त पैशाची गुंतवणूक करून हातावेगळे होतात आणि नफ्याची वाट पाहतात. हेल्थ एंजल्स मात्र पैसे, ज्ञान, अनुभव सगळ्यांचीच गुंतवणूक करतात. भालेराव हे हेल्थ एन्जल्स आहेत. एखादी संकल्पना त्यांना आवडली ती त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षात बसली तरच ते धनराशीची गुंतवणूक करतात. ही पद्धत अंगिकारल्यामुळे त्यांच्या धनाची नव्हे तर ज्ञानाचीही वृद्धी होते. त्यांच्या ज्ञानाला सद्यकालीन सुधारित माहितीचं तेज येतं.
स्टार्टअप म्हणजे स्वप्नातील संकल्पनेचा सत्यात उतरणारा आविष्कार. ती संकल्पना तुमचीच हवी असा आग्रह नाही. दुसऱ्या कोणाची तरी असू शकते. त्या बीज रुपातील संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याची मूळ व्यक्तीमध्ये कमतरता असू शकते. उद्योजक ती संकल्पना उचलतो, त्याला फुलवतो आणि त्याचं व्यवसायात रूपांतर करतो.
भालेरावांना असं वाटतं की भारतातून शिक्षणासाठी अमेरिकेत येणारे विद्यार्थी त्यांच्या शाळा-कॉलेजातील कठीण चढाओढीमुळे, शिक्षणात, अभ्यासात उत्कृष्ट निपजतात परंतु त्यांच्यात उद्योजकता अभावानेच आढळते. म्हणून मग उद्योजक न होता ते उत्तम नोकरदार बनतात. त्यांच्यातील बहुसंख्य विद्यार्थी मध्यमवर्गातून आलेले अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवेपर्यंत शैक्षणिक कर्जाच्या बोज्याखाली दबलेले असतात. अशावेळी लठ्ठ पगाराच्या स्थिर नोकरीचा पर्याय निवडतात. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर कंपनीच्या सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचतात. भालेरावांच्या मते माहिती तंत्रज्ञान ही एक संकल्पना आहे. उद्योगधंद्यात येणाऱ्या अडचणी अडचणींवर मात करण्यासाठी मदत करणारा तो फक्त एक उपाय आहे. आपण हाताळू शकू अशी हजारोंच्या संख्येत बनवलेली सुपर मार्केटमध्ये विक्रीस ठेवलेली ही कुठली वस्तू नव्हे. हा उपाय किंवा ही संकल्पना व्यक्तिगत आवश्यकतेनुसार बदलणारी हवी. ग्राहकांच्या गरजांचे सखोल ज्ञान असणं, त्याची इत्यंभूत माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. प्रतिकृती काढणे या पर्यायाचा दरवाजा बंद असल्यामुळे आपण त्यांना देत असलेला तोडगा हा त्यांच्यासाठी रामबाण उपाय आहे हे पटवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

उपक्रमाच्या संकल्पनेवर उत्कट प्रेम आणि ती यशस्वी होईलच असा दृढ आशावाद उपक्रमकर्त्याकडे असावा अशी भालेराव यांची प्राथमिक अपेक्षा असते. आत्मविश्वास तर हवाच पण त्या संकल्पनेवर श्रद्धा ही हवी. कंपनी सुरू करण्यासाठी भांडवलाची मागणी करणारयांचेही दोन प्रकार आहेत. बड्या कंपनीत काम करणारा कदाचित एखादा आयआयटी पदवीधर असेल तर तो म्हणेल, माझ्या डोक्यात ह्या प्रकल्पाची कल्पना गेल्या काही वर्षांपासून घोळते आहे. त्यासाठी भांडवल मिळाले तरच मी माझी नोकरी सोडेन. दुसरा कदाचित तितक्या नामांकित नसलेल्या शिक्षण संस्थेतील पदवीधर म्हणेल, माझ्या डोक्यात असलेली कल्पना इतकी जबरदस्त आहे,इतकी भन्नाट आहे की मी माझी नोकरी सोडून दिली आहे. आयुष्यभराची पुंजी त्यात ओतली आहे. परंतु या उपक्रमासाठी मला अधिक निधीची गरज आहे. प्रकाश भालेराव दुसऱ्या प्रकारच्या मागणीदाराच्या उपक्रमात गुंतवणूक करतील. नोकरी सोडून आपली पुंजीच काय, पूर्ण जीवन पणाला लावणाऱ्या माणसाचं आपल्या संकल्पनेवर अघाद प्रेम आहे, गाढ श्रद्धा आहे. त्यांची चिकाटी, त्याचा निग्रह त्यात दिसून येतो. प्रकाश भालेराव यांच्या मते शेवटी ही दृढताच त्याला यशाच्या मार्गावर नेऊन सोडणार असते आणि हाच खरा यशाचा मूलमंत्र असतो .

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division