आर्थिक क्षेत्रातील लक्षवेधी व्यक्तिमत्व
                                            - मुकुंद मनोहर चितळे

mukund chitaleबुद्धिवैभव दाखवणारा चेहरा आणि अदबशीर व्यक्तिमत्त्वाचे धनी मुकुंद मनोहर चितळे. नावाजलेल्या मुकुंद एम्.चितळे आणि कंपनीचे स्थापती. त्यांच्या शांत पण ठाम आवाजात जेव्हा आपला जीवनपट उलगडत जातात तेव्हा ऐकणारा त्यांच्या कर्तृत्वाने चकित होत जातो.

मध्यमवर्गीय घरात मुकुंदरावांचा जन्म झाला. वडील महानगरपालिकेत नोकरीला,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. तर आई राष्ट्रसेविका समितीत कार्यरत. त्यामुळे आरएसएसच्या शिस्तीचे संस्कार मुकुंदरावांवर लहानपणापासूनच झालेले. त्यांचे व बहिणीचे बालपण शिवडीत गेले.चौथीपर्यंत महानगरपालिकेच्या शाळेत गेल्यावर वडलांनी पाचवीला गिरगावातील आर्यन हायस्कूल मध्ये घातले. त्यानंतर ते पार्ल्याचे रहिवासी झाले आणि पार्ले टिळकचे विद्यार्थीही. मॅट्रिकनंतर सिडनहॅम कॉलेजमधून बीकॉम केले व नंतर १९७२ साली सीएची परीक्षा प्रथम प्रयत्नांत मेरिट लिस्ट मध्ये पास झाले.

सीए झाल्यावर फायझर कंपनीत नोकरी मिळाली. पण प्रथमपासूनच स्वतंत्र व्यवसाय करण्याचे मनात असल्याने ४/५ महिन्यात नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला. त्यांचे एक हितचिंतक खानखोजे यांनी त्यांना त्याच वेळी कुंदनानी कॉलेजमध्ये अकाउंटन्सीसाठी लेक्चरर होण्याचा सल्ला दिला. पुढे ७८ साली त्यांनी सिडनहॅम कॉलेजमध्ये शिकवायला अर्धवेळ प्राध्यापक म्हणून सुरुवात केली. ७८ ते ९३ या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी अकरावी ते एमकॉममध्ये सर्व वर्षांना अकाउंटन्सी संबंधित सर्व विषय शिकवले. त्यांच्या तासाला इतर वर्गातील मुलेही येऊन बसत. प्राध्यापक घटालिया यांच्या सल्ल्यानुसार “वर्गावर नेहमी दोनशे टक्के अभ्यास करून जात जा” या सल्ल्याला प्रमाण मानल्याने मुकुंदराव नेहमीच लोकप्रिय शिक्षक राहिले. मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही त्यांनी शिकवले तसेच अकाउंटंसी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित करण्याच्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या मंडळावर त्यांनी काम केले. प्राध्यापक म्हणून केलेल्या कामामुळे सुरुवातीला आर्थिक स्थैर्य मिळाले, त्याचबरोबर शिकवण्यासाठी होणारा अभ्यास, विषय मांडण्याची कला याचा पुढील वाटचालीत खूप उपयोग झाला.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) च्या सेंट्रल कौन्सिलचे मुकुंदराव १९८५ ते १९९८ सभासद राहिले. त्यात १९९६-९७ ला व्हॉइस प्रेसिडेंट व १९९७-९८ प्रेसिडेंट ही महत्त्वाची पदे भूषवली. भारतीय सीए तरुणांना इंग्लंडमध्ये हा व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. मात्र तेथील सीए व्यवसायिक भारतात हा व्यवसाय करत. या विरोधात पावले उचलून भारतीय तरुणांना न्याय मिळवून देण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्याचप्रमाणे सीएच्या विद्यार्थ्यांशी संपर्क जोडण्यासाठी न्यूज लेटर चालू केले.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंटच्या इंटरनॅशनल ऑडिटिंग कमिटीचे ते १९९८-२००० मध्ये सदस्य राहिले आहेत. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअरच्या विविध क्षेत्रातील अकाउंटिंग स्टॅंडर्ड ठरवणाऱ्या कमिटीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन कृत बँक, कमर्शियल अॅंड फायनान्शिअल फ्रॉडच्या बोर्डावर सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. कंपनी कायदा सल्लागार समितीचे ते सदस्य होते. कमकुवत बँकांच्या पुनर्बांधणी कमिटीवर (वर्मा कमिटी) तसेच सेवा क्षेत्रातील कंपन्यांची पद्धती व कार्यकुशलता (तारापूर कमिटी) यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापित कमिटीवर त्यांनी काम केले आहे. सध्या सेबीच्या प्रायमरी ऍडव्हायझरी कमिटीचे ते सदस्य आहेत. रिझर्व बँक कृत अर्बन कोऑ बँकांच्या अमालगमेशन ग्रुपचे ते सदस्य आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI)च्या अकाउंटिंग विषयाच्या स्टँडिंग कमिटीचे ते अध्यक्ष आहेत.

आजही लार्सन एंड टुब्रो, एल अॅंड टी इन्फोटेक, अतुल लिमिटेड इत्यादीं ९ कंपन्यांचे ते Independent Director आहेत. याशिवाय आजवर ओएनजीसी, आयडीबीआय बँक, एलआयसी फायनान्स, एसबीआय म्युच्युअल फंड आदी सोळा मान्यवर कंपन्यांच्या संचालक पदी मुकुंदरावांनी काम पाहिले आहे. प्रिन्सिपल पीएनबी असेट्स मॅनेजमेंटच्या चेअरमन पदी व एसबीआय म्युच्युअल फंडांच्या विश्वस्तपदी त्यांनी कार्य केले आहे.

या सर्व कार्यात मग्न असतानाच १९७३ पासून स्वतःची "मुकुंद एम चितळे आणि कंपनी" ते मोठी करीत आहेत. आज त्यांच्यासह एकूण दहा भागीदार या कंपनीत आहेत. रोजचा १२५ माणसांचा कर्मचारीवर्ग कंपनीत काम करतो. सुरुवातीला ऑफिसच्या जागेसाठी त्यांचे शेजारी दादा परांजपे यांनी केलेली मदत आणि १९९० साली विलेपार्ले येथे ऑफिस हलविण्यासाठी रसिकलाल वोरा यांनी केलेली मदत त्यांना अतिशय मोलाची वाटते. भारतात प्रथम 'ISO 9000' चे सर्टिफिकेशन मिळालेली MMC पहिली सीए फर्म आहे. MMC ने सेंट्रल स्टेट्युटरी ऑडिटर म्हणून रिझर्व बँक, स्टेट बँक, एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक, एलआयसी इ. कंपनींचे काम केलेले आहे. MMC ने गुजरातमधील माधवपुरा मर्कंटाईल सहकारी बँकेच्या पुनरुजीवनासाठी मोठा सहभाग केला होता. MMC CA&G (कॅग) साठी अनेक राष्ट्रीयकृत कंपन्यांचे ऑडिट करत आहे. तसेच जागतिक बँकेसाठी काही ठिकाणी सल्लागाराची भूमिकाही निभावत आहे. MMC मधून सीए करून विविध क्षेत्रांमध्ये आणि व्यवसायामध्ये कार्यरत असलेले त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत.

या अतिशय कार्यमग्न प्रवासात मुकुंदरावांना पत्नी सौ. विद्या यांची मोलाची साथ लाभली. स्वतः एमएससी झालेल्या विद्याताई अनेक वर्षे कंपनीचे कार्यालयही सांभाळत होत्या. मात्र दहा वर्षांपूर्वी किडनी विकाराने त्यांना देवाज्ञा झाली. दोन कर्तबगार मुलगे सौरभ व सुश्रुत दोघेही C. A. असून मुकुंद म. चितळे कं. मध्ये भागीदार आहेत, दोन सुना योगिता व अश्विनी आणि दोन नातू आयुष व विहान असे भरलेले कुटुंब त्यांच्या पाठी उभे आहे. योगिता संगीतक्षेत्रात तर अश्विनी लग्नानंतर सीए करून कंपनीत कार्यरत आहेत.

मुकुंदरावांचा भायंदरनजीक उत्तन येथील केशवसृष्टीचे अध्यक्ष, टिळक मंदिरचे अध्यक्ष या शिवाय चित्तपावन फाउंडेशन, ब्राह्मणसभा गिरगाव, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन या संस्थांशी ते निगडित आहेत. सोबती पेरेंट्स असोसिएशन या मतिमंद मुलांच्या पालकांसाठी चालवलेल्या प्रकाश बाळ यांच्या संस्थेच्या निवासी शाळेमागे ते भक्कम उभे आहेत. एवढ्या कार्यमग्नतेचे व तंदुरुस्त असण्याचे गमक म्हणजे योग्य व्यायाम तर आहेच पण सततच्या प्रवासामध्ये खाण्यात होणाऱ्या बदलांमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी त्यांनी संपूर्ण शाकाहार अंगीकारला. त्याचबरोबर वेगवेगळी कामे करतांना वेगवेगळ्या विषयात रेडिओसारखे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला आपल्या मनाला शिकविले. वाचन आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हेच खरं तर त्यांचे छंद आणि यशाचे गमक आहे.

मुकुंदरावांचा आदर्श सर्वच तरुण पिढीने अंगीकारावा असा आहे.

-- संगीता बेहेरे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division